विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ संस्थेतर्फे दिला जाणारा ग्रंथगौरव पुरस्कार यंदा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे येत्या रविवारी (२२ नोव्हेंबर) वितरण होणार आहे.

संस्थेचे संस्थापक सचिव अशोक जोशी यांच्या देणगीतून हा पुरस्कार १९८४पासून दिला जात आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता उत्कर्ष मंडळाचे शानभाग सभागृह, मालवीय पथ, विलेपार्ले (पूर्व) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला ‘एल अँड टी’चे यशवंत देवस्थळी हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पुरस्काराच्या निवड समितीमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रहास देशपांडे, अ‍ॅड. किशोर जावळे, डॉ. विवेक भट, डॉ. चारुशीला ओक आणि लेखिका माधवी कुंटे यांचा समावेश होता अशी माहिती मंडळाच्या कार्याध्यक्ष अलका गोडबोले यांनी दिली. लेखकाला रोख रुपये १० हजार आणि प्रकाशकांना रोख रुपये ५ हजार असे पुरस्काराचे स्वरूप असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी हा पुरस्कार नरेंद्र चपळगावकर, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, विनया खडपेकर, स. ह. देशपांडे, सुलभा ब्रह्मनाळकर आदी मान्यवर लेखकांना देण्यात आला आहे.