पाच, दहा रुपयांची नाणी मोठय़ा संख्येने जमा; नागरिकांना, व्यापाऱ्यांना नोटांच्या बदल्यात नाणी देण्याचा निर्णय

बेस्टचे किमान तिकीट ५ रुपये केल्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले असले तरी बेस्टकडे आता मोठय़ा संख्येने पाच, दहा रुपयांची नाणी जमा होत आहेत. त्यामुळे या नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहे. ही नाणी नागरिकांना, व्यापाऱ्यांना नोटांच्या बदल्यात देण्याचा बेस्टचा विचार आहे. ज्यांना ही नाणी हवी असतील त्यांना बेस्टच्या आगारात ही नाणी नोटांच्या बदल्यात मिळू शकतील.

बेस्टने ९ जुलैपासून नवीन तिकीटरचना अमलात आणली. त्यात पाच किमीसाठी पाच रुपये आणि त्यापुढे १० किमीपर्यंत १० रुपये अशी नवीन तिकीटरचना लागू झाली. तिकीट कपात झाल्यामुळे प्रवासी मोठय़ा संख्येने बेस्टकडे वळले आहेत. मात्र त्यामुळे बेस्टकडे मोठय़ा प्रमाणावर दहा, पाच, दोन आणि एक रुपयांची नाणी आणि दहा व वीस रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. ही नाणी व नोटा नागरिकांना, व्यापारी वर्गाला आणि समाजातील इतर तत्सम घटकांना उच्च मूल्यवर्गाच्या नोटाच्या बदल्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्यांना सुटय़ा नाण्यांची आवश्यकता असते अशांना ही नाणी व नोटा बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारांमधे तिकीट व रोख विभागात (रविवार आणि सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून) सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत मिळू शकतील.

सध्या ‘डेड स्टॉक’

प्रवाशांनी दिलेली दहा रुपयांची व पाच रुपयांची नाणी हा बेस्टसाठी मोठा डोकेदुखीचा विषय झाला आहे. ही नाणी बँक घेत नसल्यामुळे लाखोंच्या नाण्यांचा ‘डेड स्टॉक’ बेस्टकडे आहे. तो कमी करण्यासाठी बेस्टने यापूर्वी कर्मचाऱ्यांना पगार नाण्यांच्या स्वरूपात देण्याचाही प्रयोग केला. बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा होत असले तरी त्यापैकी काही रक्कम ही नाण्यांच्या स्वरूपात दिली जाते. मात्र तरीही मोठय़ा प्रमाणावर नाणी पडून राहत असतात आणि त्याचा बेस्टला उपयोग होत नाही. त्यामुळे ही नाणी नागरिकांना देण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.