चालक-वाहकांचे लसीकरण करण्याची मागणी

मुंबई : टाळेबंदीपासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वांची ने-आण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या बेस्ट उपक्रमातील सुमारे दोन हजार ८४६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.  दरम्यान करोनाकाळात अविरत सेवा देणाऱ्या बेस्टचालक-वाहकांचे लसीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेस्ट समिती सदस्यांनीही याबाबत मुंबई महापालिका व बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाळेबंदी लागू होताच बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू केली. त्याचबरोबर श्रमिकांना रेल्वे स्थानकापर्यंत,  प्रवाशांना मुंबई विमानतळापासून करोना के ंद्रापर्यंत नेण्यासाठी बसगाड्या सोडण्यात आल्या. बेस्ट प्रवास सर्वांसाठी खुला होताच ताफ्यातील सर्व ३,५०० बसगाड्या पुन्हा रस्त्यावरून धावू लागल्या.

त्यासाठी सर्वच चालक-वाहकही कर्तव्यावर हजर राहिले. ही सेवा देतानाच काही चालक-वाहकांना करोनाची लागण झाली. चालक-वाहकांबरोबरच बस आगारातील कर्मचारीही करोनाबाधित झाले. याशिवाय उपक्रमातील यांत्रिकी विभाग, विद्युत विभाग, अभियंता विभाग आणि सुरक्षा रक्षकही अत्यावश्यक सेवेसाठी हजर राहिले. त्यावेळी यातील अनेकांना करोनाची लागण झाली. त्यातील काहींना प्राणही गमवावे लागले. करोनाची बाधा झालेल्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत कर्तव्यावर असताना दोन हजार ८४६ जणांना करोनाची लागण झाली. यातील दोन हजार ७२५ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. बेस्टमधील बाधित कर्मचारी करोनामुक्तीचे प्रमाण ९६ टक्के  आहे. तर कर्तव्यावर नसलेले १०७ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समजते. यातील ९५ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत असून ती ५७ वर पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.