मुंबई : ‘बेस्ट’च्या गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपादरम्यान हाल सोसत, मिळेल त्या मार्गाने प्रवास पूर्ण करत मुंबईकरांनी दिवस ढकलले. या काळात मुंबईकरांनी रेल्वे-मेट्रोची वाढती गर्दी झेलली आणि रिक्षा-टॅक्सींची मनमानीही सोसली. पण परिस्थिती आणि मुंबईकरांचे हाल ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळेच आता प्रवाशांच्या संयमाचा कडेलोट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत मेट्रो आली, मोनोही धावू लागली, उड्डाण पुलांपाठोपाठ फ्री वे, सागरी सेतू झाला, महामार्ग, जोडमार्गाचे जाळे तयार झाले आणि खासगी वाहनांची गर्दीही वाढू लागली. मुंबईशेजारच्या महापालिकांच्या बससेवा उपनगरे आणि मंत्रालयांपर्यंत येजा करू लागल्या, तरीही मुंबईची खरी जीवन वाहिनी असलेल्या बेस्टचे महत्त्व कायमच आहे, हे गेल्या ८ जानेवारीपासूनच्या बेस्ट संपाने दाखवून दिले. तोंड दाबून बुक्क्य़ाचा मार म्हणजे काय याचा नेमका अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत.

बेस्टच्या भरवशावर सकाळी ठरलेल्या वेळी घराबाहेर पडून स्टेशन गाठणारा व ठरलेली लोकल पकडणारा नोकरदार मुंबईकर रस्त्यावर ताटकळण्याचा आठ दिवसांचा अभूतपूर्व आणि केविलवाणा अनुभव घेत आता बेस्ट प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारच्या नावाने बोटे मोडू लागला आहे. अगोदरच जीव मुठीत घेऊन क्षणाक्षणाचा हिशेब करीतच पायाला चाके लावत धावाधाव करणाऱ्या प्रत्येकाचेच वेळापत्रक कोलमडून टाकणाऱ्या बेस्टच्या संपामुळे आता खिसेदेखील रिते होऊ लागले असून टॅक्सी-रिक्षाच्या वाढीव बोजापायी अंदाजपत्रकही कोलमडून गेले आहे. एरव्ही श्रेयासाठी धडपडणाऱ्या सत्ताधारी नेत्यांनी  मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे, महापालिका प्रशासन मूग गिळून राजकारणाच्या लपंडावाकडे पाहात आहे, राज्य सरकार पालिकेकडे बोटे दाखवत आहे, आणि कामगार संघटना कुणाचेच जुमानत नाहीत अशा परिस्थितीमुळे हतबल झालेल्या मुंबईकरांची तिहेरी कोंडी झाली आहे. संपामुळे सुरू झालेल्या हलाखीतून मार्ग काढण्याची कुणाचीच इच्छा दिसत नसल्याची भावनाही आता व्यक्त होऊ लागली असून, सामान्य माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचा खेळ प्रशासनाने करू नये, अशा शब्दांत संतापास वाचा फुटू लागली आहे..

गेले आठवडाभर रस्त्यावरील बेस्ट बसगाडय़ा आगारात उभ्या राहिल्याने, आता प्रवासी मुंबईकरांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे. केविलवाण्या चेहऱ्याने रिक्षाचालकांसमोर हात पसरणारे नोकरदार आणि त्यांना न जुमानता मुजोरीत गिरक्या मारणारे रिक्षाचालक असे चित्र गेले आठवडाभर सर्वत्र दिसले. मात्र, आता मुंबईकर आक्रमक होऊ लागला आहे. दोनपाच रुपये जादा उकळणारा, शेअर रिक्षा-टॅक्सी थांब्यावरून प्रवाशांची नेआण करताना प्रवाशांच्या असहाय्यतेचा अवास्तव फायदा उकळणारा रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांच्या संतापाचा अनुभव घेऊ लागला आहे. हा संताप तुर्तास व्यक्तीव्यक्तींपर्यंत विखुरला असला तरी, तो कोणत्याही क्षणी सामूहिक रुद्रावतार घेऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एके काळी मुंबईने प्रदीर्घ लांबलेले अनेक संप पाहिले, त्याचे चटकेही सोसले. अशा संपकाळात होणारे हिंसाचार, नासधूसही अनुभवली. त्यांचे ओरखडे अजूनही बुजलेले नसल्याने बेस्टच्या ताणलेल्या संपकाळातही मुंबईकरांनी अभूतपूर्व संयम दाखविला आहे. बेस्टची प्रतिष्ठा जपण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या बेस्ट कामगारांप्रति मुंबईकरांची सहानुभूतीही आहे. म्हणूनच, गेल्या आठवडाभर मुंबईकरांनी आकांडतांडव न करत प्रवासाच्या झळा सोसल्या. या संयमाचा अंत पाहू नका, असेही आता रस्तोरस्ती पायपीट करणारे मुंबईकर सत्ताधाऱ्यांस विनवू लागले आहेत.