महानगरांमधील वाढनांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला जातो. नागरिकांनी स्वत:च्या गाडय़ा वापरण्याचे टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी अपेक्षा असते. दिल्लीत मेट्रो सुरू झाल्यावर काही अंशी फरक पडला. प्रवाशांना मेट्रो, वातानुकूलित बसेसचा पर्याय उपलब्ध असल्यास या साधनांचा नक्कीच वापर केला जाऊ शकतो. मुंबईत मात्र नेमका याचाच अभाव आहे..

तोटय़ात चालत असल्याने ‘बेस्ट’ प्रशासनाने वातानुकूलित बसेस बंद केल्या. ही सेवा बंद झाली आणि शेजारील ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या मुंबईत येणाऱ्या वातानुकूलित बसेसना प्रवाशांची मागणी वाढली. ‘बेस्ट’ची सेवा सुरू असताना ठाणे महापालिका परिवहन सेवेची ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावरील बस अनेकदा रिकामी जात असे. पण गेल्या दोन आठवडय़ांत या मार्गावरील बस खचाखच भरून जाऊ लागली. नवी मुंबईच्या वातानुकूलित बससेवेचे उत्पन्न गेल्या दोन आठवडय़ांमध्ये वाढले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून सर्व महानगरांमध्ये वातानुकूलित बसेसचा पर्याय साधारपणे दहा वर्षांपूर्वी पुढे आला. दिल्ली, मुंबई, बंगलोर या साऱ्याच मोठय़ा शहरांमध्ये या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘बेस्ट’ने ही सेवा सुरुवातीला सुरू केली तेव्हा ठाणे आणि नवी मुंबईत येणाऱ्या बसेसना चांगला प्रतिसाद होता. नंतर बसेसची अवस्था आणि वाढलेले भाडे यातून प्रवाशांच्या मनातून ‘बेस्ट’ची वातानुकूलित सेवा उतरत गेली. प्रवाशांची संख्या रोडावल्याने पुन्हा दर कमी करण्यात आले. पण बसेस बंद पडण्याचे वाढते प्रमाण, वातानुकूलित यंत्रणेतील दोष यातून प्रवासी दुरावत गेले. याच दरम्यान ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक यंत्रणांनी आपल्या ताफ्यात वातानुकूलित बसेसची संख्या वाढविली. नव्या बसेसना चांगला प्रतिसाद मिळत गेला.

महानगरांमधील वाढनांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला जातो. नागरिकांनी स्वत:च्या गाडय़ा वापरण्याचे टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी अपेक्षा असते. दिल्लीत मेट्रो सुरू झाल्यावर काही अंशी फरक पडला. प्रवाशांना मेट्रो, वातानुकूलित बसेसचा पर्याय उपलब्ध असल्यास या साधनांचा नक्कीच वापर केला जाऊ शकतो. मुंबईत मात्र नेमका याचाच अभाव आहे. समुद्रकिनारा असलेल्या अनेक देशांतील महानगरांमध्ये जलवाहतुकीचा पर्याय असतो. मुंबईत पावसाळा सोडल्यास निदान आठ महिने तरी जलवाहतूक फायदेशीर ठरू शकते. पण परवानग्यांच्या कचाटय़ातून जलवाहतुकीला मुहूर्त सापडलेला नाही. मागे नवी मुंबईतून जलवाहतूक सुरू करण्यात आली होती, पण तोही प्रयोग फसला. आता पुन्हा भाजप सरकारने जलवाहतुकीची घोषणा केली आहे. जलवाहतुकीला मुंबईत किती प्रतिसाद मिळेल याबाबत काहीशी शंका व्यक्त केली जाते.

‘बेस्ट’ हा मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा, पण गेल्या काही महिन्यांमध्ये ही सेवा तगणार कशी अवस्था निर्माण झाली. अधिकाऱ्यांचे वेतन देताना नाकीनऊ आले. अन्य कोणत्याही सेवेपेक्षा ‘बेस्ट’ची सेवा अजूनही बेस्ट समजली जाते. पण या सार्वजनिक सेवेचे नियोजन कुठे तरी बिघडले. दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी दरवाढ केल्यावर प्रवासी संख्या घटते. २०१५ या वर्षांत प्रतिदिन प्रवाशांची संख्या ३३ लाख ४७ हजारांवरून २०१६ मध्ये २९ लाखांवर घटली. (संदर्भ – आर्थिक पाहणी अहवाल) म्हणजेच वर्षभरात ‘बेस्ट’च्या प्रवाशांची संख्या साडेचार लाखांनी घटली आहे. ‘बेस्ट’चे प्रवासी कमी होण्यास अन्य कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झालेली नाही. याचाच अर्थ प्रवाशांनी रिक्षा, टॅक्सी किंवा उबेर वा ओला या वाहतूक व्यवस्थेचा आधार घेतला आहे. दरवाढीबरोबरच सेवा वक्तशीर नसल्यानेच प्रवाशांची संख्या घटली आहे. नवीन बसेस खरेदी करून ‘बेस्ट’ वक्तशीरपणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सेवा सुधारणे मुंबईकरांची गरज आहे. देशातील सर्वच महानगरांमध्ये उबेर आणि ओला या खासगी टॅक्सी सेवेचे प्रस्थ वाढले आहे. मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या दहा गाडय़ांमध्ये सरासरी तीन ते चार ओला किंवा उबेर टॅक्सी दिसतात. वातानुकूलित, मोबाइलवरील अ‍ॅपवर नोंदणी केल्यावर आठ ते दहा मिनिटांमध्ये उपलब्ध होणारी ही वाहतूक व्यवस्था आता अंगवळणी पडू लागली आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मुंबई, ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आर.टी.ओ.) नोंदणी होणाऱ्या वाहनांमध्ये अलीकडच्या काळात टॅक्सींची संख्या वाढल्याचा अनुभव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आला आहे. राज्यात ‘बेस्ट’पाठोपाठ पुणे परिवहनचा व्याप मोठा आहे. पण ‘बेस्ट’प्रमाणेच पुणे परिवहनच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची चर्चा करताना ‘बंगलोर मेट्रोपोलिटिन ट्रान्स्पोर्ट’ (बीएमटीसी) सेवाचा उल्लेख करावा लागेल. बंगलोरच्या कॅम्पेगौडा विमानतळाच्या बाहेर ‘वायूवज्र’ नावाची वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कार्यालये असलेल्या इलेट्रॉनिक्स सिटीसह शहराच्या महत्त्वाच्या भागांमध्ये जाण्यासाठी या बसेस उपलब्ध आहेत. २३० ते २५० रुपयांमध्ये विमानतळापासून बंगलोर शहरात कोठेही जाता येते. प्री-पेड टॅक्सीसेवा हजार रुपयांपेक्षा जास्त तर ओला-उबेर ७०० ते ८०० रुपये दर आकारत असताना ‘वायूवज्र’ सेवेने निम्म्या दरात शहर गाठणे सोपे जाते. या वातानुकूलित सेवेच्या बसेसच्या फेऱ्याही चांगल्या आहेत. मुंबई विमानतळाच्या बाहेर आल्यावर ‘बेस्ट’ची बस पकडण्यासाठी चालावे लागते. लंडन किंवा बर्मिगहॅम या विमानतळांच्या बाहेर आल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसेस उभ्या असतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत.

मुंबईत आता मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू झाले आहे. ही सेवा प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास अजून तीन ते चार वर्षे नकीच लागतील. त्यानंतर मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल. दिल्लीत मेट्रो सुरू झाल्यावरही वाहनांची संख्या तेवढी घटलेली नाही, अशी आकडेवारी दिल्ली सरकारकडूनच प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्याऐवजी केंद्रातील सरकारने आता मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला आहे. सुमारे एक लाख कोटींचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प कितपत किफायतशीर ठरणार, हा मुद्दा आहेच. मुंबईकरांना वातानुकूलित उपनगरीय सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा रेल्वेने अनेक वर्षांपूर्वी केली. अजून या सेवेची चाचणी पूर्ण व्हायची आहे.

मुंबईतील वाहतूक समस्या दूर करण्याकरिता सागरी मार्ग, शिवडी-न्हावाशेवा सागरी पूल, वरळी-वांद्रे सागरी पुलाचे विस्तारीकरण या प्रकल्पांची नुसतीच चर्चा होत असते. राज्यकर्ते घोषणा करतात, पण प्रत्यक्ष प्रकल्प कागदावरच राहतो, असा आजवरचा अनुभव आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याबरोबरच पायाभूत सुविधाही सक्षम करणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे-भिवंडी बायपास मार्गाचे रुंदीकरण, घाईघाईत पुलाची उभारणी करणाऱ्या (कोणाच्या फायद्यासाठी?) सरकारी यंत्रणांनी आधी आवश्यकता आहे तेथे लक्ष देणे गरजेचे आहे. एखाद्या विकासकाच्या फायद्यासाठी सारा जोर लावायचा आणि जेथे खरी गरज आहे तेथे दुर्लक्ष करायचे या सरकारी धोरणामुळेच सुधारणा होत नाही.