ब्रीदवाक्य सुचवण्याचे प्रवाशांना आवाहन

मुंबईच्या वैभवशाली परंपरेचा एक भाग असलेल्या बेस्ट उपक्रमात प्रवाशांशी निगडीत असलेल्या कोणत्याच योजनेत प्रवाशांना कधीच विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार प्रवाशांकडून नेहमीच केली जाते. याच धर्तीवर प्रशासनाने बेस्टचे नवीन ब्रीद वाक्य प्रवाशांनी सुचवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ब्रीद वाक्य सुचवणाऱ्या प्रवाशांना तीन महिन्यांचा वातानुकूलित गाडीचा तसेच सहा महिन्यांचा साध्या बस गाडीचा पास पारितोषिक म्हणून दिला जाणार आहे.

‘कार्यक्षम सेवेची अखंड परंपरा’ या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करू पाहणाऱ्या बेस्ट उपक्रमाने काळानुसार आणि बेस्टच्या सध्याची परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या ब्रीदवाक्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्यादाच मुंबईकरांना नवीन ब्रीदवाक्य सुचवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यात बेस्टकडून सर्वोत्कृष्ट ब्रीदवाक्य सुचवणाऱ्याला तब्बल १४ हजार ४०० रुपये किंमतीचा तीन महिन्यांचा वातानुकूलित बस गाडीचा तसेच जलद, मर्यादित आणि साध्या बसचा पास किंवा १० हजार ८० रुपये किंमतीचा सहा महिन्यांचा असा जलद, मर्यादित आणि साध्या बस गाडीचा बस(यांपैकी कोणताही एक) पारितोषिक म्हणून दिला जाणार आहे.

‘बेस्ट’सोबत सेल्फी काढा, पास जिंका!

बससोबत नागरिकांनी सेल्फी काढून बेस्टकडे पाठवण्याचे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना बेस्ट बस गाडीचा पास देण्यात येणार आहेत. यात प्रथम पारितोषिक विजेत्याला १० हजार ८० रुपये किंमतीचा सहा महिन्यांचा, द्वितीय पारितोषिक विजेत्यास ५ हजार ४० रुपये किंमतीचा ३ महिन्यांचा तर तृतीय पारितोषिक विजेत्यास १७०० रुपये किंमतीचा १ महिन्याचा पास दिला जाणार आहे. हे बस पास जलद, मर्यादित आणि साध्या बसगाडीत वैध राहतील, असे बेस्टकडून सांगण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी ब्रीद वाक्य किंवा सेल्फीसह नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक १० जूनपर्यंत probestundertaking@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.