बेस्ट उपक्रमाने आपल्या वडाळा आगारामध्ये स्थापन केलेल्या अद्ययावत बस नियंत्रण कक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. या कक्षातील आयटीएसएम प्रणालीच्या (इंटिलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम) माध्यमातून बेस्टच्या बस आणि त्यांच्या फेऱ्यांचे नियोजन व नियंत्रण करण्यात येणार आहे. परिणामी, आता बेस्टची प्रत्येक बस वेळापत्रकानुसारच धावेल.

लोकल, मेट्रो या एका मार्गाने जाणाऱ्या सेवा आहेत, परंतु त्यांचा विस्तार होत आहे. परिणामी स्पर्धा निर्माण होत असून ती टाळण्यासाठी नवीन मार्गाचा व पर्यायांचाही विचार करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी बेस्ट उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना केली. बेस्टने आतापर्यंत बरीच प्रगतीही केली आहे. सध्या बेस्टसमोर स्पर्धा निर्माण झाली असली तरीही मुंबईकरांना बेस्टवरही विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आणखी मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे नियंत्रण कक्षाचे उद्घाटन केले.

होणार काय?

बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनाचे नियंत्रण वाहतूक परिवहन अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून स्वतंत्रपणे करण्यात येत होते. अद्ययावत नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ते एकत्रितपणे केले जाणार आहे. नियंत्रण कक्षात दोन ‘व्हिडीओ वॉल’ असून ५५ इंच आकाराचे ९ टीव्ही स्क्रीन बसविण्यात आले आहेत. या कक्षात एकू ण ३२ कर्मचारी तैनात असतील. बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असून त्याच्या आधारे बसचा ठावठिकाणा नियंत्रण कक्षातून समजेल. बस सेवेत अनियमितता असल्याचे निदर्शनास येताच संबंधित विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना यातून सूचित केले जाणार आहे. मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडचणींचा सामना करावा लागल्यास तेही नियंत्रण कक्षाला समजेल. बसमध्ये बिघाड झाल्यास चालक, वाहकाला दिलेल्या ‘बेस्ट मोबाइल अ‍ॅप’च्या माध्यमातून ती माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.