साध्या बसचे पाच किमीसाठी पाच रुपये

वातानुकूलितचे सहा रुपये भाडे

जुलैपासून भाडेकपात लागू होण्याची शक्यता

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना फटका

प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी ‘बेस्ट’ परिवहन सेवेच्या भाडय़ात कपात करण्यास बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे साध्या बसचे भाडे किमान पाच रुपये तर कमाल २० रुपये राहणार असून वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये तर कमाल भाडे केवळ २५ रुपये होणार आहे. यामुळे मुंबईकरांची प्रवासखर्चात मोठीच बचत होणार आहे.

विधानसभा निवडणुकांआधीच हा निर्णय घेतला गेल्याने त्याच्या अंमलबजावणीला मोकळी वाट मिळणार आहे. बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर राज्य परिवहन प्राधिकरणाकडे जाईल. साधारण जुलैच्या पहिल्या आठवडय़ात नवीन भाडेदराची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

याआधी साध्या बसचे किमान भाडे आठ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये होते. वातानुकूलित बसचे किमान भाडे १५ रुपये तर कमाल भाडे १३० रुपये होते. सध्या मुंबईत टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपये असून तेदेखील वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे २५ रुपये हे वातानुकूलित बसचे कमाल भाडे हे मुंबईकरांसाठी सुखद आश्चर्याचा धक्का ठरणार आहे. तसेच बेस्टची ही भाडेकपात रिक्षा-टॅक्सी चालकांना फटका देणारीही ठरणार आहे.

बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मुंबई पालिकेने सहा महिन्यांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. मात्र येत्या तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करून कार्यवाही सुरू करण्याचे आदेश करारातून देण्यात आले होते. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्तावही तयार केला आणि तो मंजुरीसाठी बेस्ट समितीसमोर ठेवला.  मंगळवारी या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत शिवसेना, भाजप, काँग्रेस सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र तीन महिन्यांत सध्याच्या बसगाडय़ांचा ताफा सहा हजापर्यंत नेण्याचेही उद्दिष्ट असून त्यासाठी लागणारी जागा, वाढविण्यात येणाऱ्या फेऱ्या इत्यादींचे नियोजन कसे करणार, असा सवाल उपस्थित केला. त्यासाठीही नियोजन केले जात असून लवकरच तेही सादर केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कुलाबा येथील बेस्ट भवनला प्रथमच भेट दिली. यापुढे बेस्टमध्ये वातानुकूलित बस गाडय़ांची संख्या वाढवतानाच रेल्वे स्थानक ते खासगी आणि सरकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या जातील, विजेवर धावणाऱ्या ५०० बसगाडय़ाही दाखल होतील, तसेच मेट्रो आणि बेस्टची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सवलती..

* वरिष्ठ नागरिकांना मासिक आणि त्रैमासिक बसपासमध्ये ५० रुपये आणि २०० रुपये इतकी सवलत.

* प्रवासी अंतराच्या बसपास एवढा कॉर्पोरेट बसपास.

* सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वार्षिक बसपास ९०० रुपये.पत्रकारांचा वार्षिक बसपास ३६५ रुपये.

महसुलाला धोका नाही

बसभाडय़ाचे सुसूत्रीकरण केल्यास वार्षिक वाहतूक महसुलामध्ये घट होऊ शकते. परंतु बसभाडे विचारात घेता आणि अंतरामधील टप्प्यामध्ये सुधारणा केल्यामुळे प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे महसुलाची हानी काही प्रमाणात भरून काढता येईल, अशी आशा बेस्ट प्रशासनाने व्यक्त केली.

आता लवकरच

मुंबई पालिकेची मंजुरी घेऊन राज्य परिवहन प्राधिकरणाकडेही हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवू. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात नवीन भाडेदर लागू करू. याचप्रमाणे बसगाडय़ांचा ताफाही येत्या तीन महिन्यांत वाढवण्यात येईल. – सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

नवीन भाडेदर

किमी   सर्वसाधारण    वातानुकूलित

बस         बस

५ किमी    ५ रु         ६ रु

१० किमी   १० रु      १३ रु

१५ किमी   १५ रु      १९ रु

१५ किमी पुढील  २० रु      २५ रु

दैनंदिन बस पासचे दर

सेवेचा प्रकार बस पास दर

बिगर वातानुकूलित     ५० रुपये

वातानुकूलित     ६० रुपये