गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी किंवा मढ येथील चित्रिकरण स्थळे येथे रात्री अपरात्री चित्रिकरण संपवणाऱ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा किमान मुख्य शहरापर्यंत येण्याचा प्रश्न ‘बेस्ट’ने सोडवला आहे. मढ जेट्टी आणि चित्रनगरी येथून रात्री अडीच वाजता वडाळा आगाराकडे एक-एक बस सोडण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या प्रकरणी शिवसेना चित्रपट सेनेने बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांना निवेदन दिले होते. ‘बेस्ट’ने या मागणीला मंजुरी दिली असली, तरी या सेवेचे उद्घाटन शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
मढ तसेच गोरेगावची चित्रनगरी येथे रात्री-अपरात्रीपर्यंत चित्रिकरण करणाऱ्या कलाकार तसेच तंत्रज्ञांना मुख्य शहरात परतण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते. अनेकदा मोठमोठे कलाकार आपापल्या गाडय़ांमधून घरी जातात. मात्र सहकलाकार किंवा बॅकस्टेज तंत्रज्ञ, रंगभूषाकार, लाइट बॉय वगैरेंना सर्व काम आटपून निघण्यासाठी आणखी उशीर होतो. अनेकदा त्यांना चित्रनगरीत उघडय़ावरच झोपून पहाटे लवकर निघावे लागते. हे टाळण्यासाठी रात्री उशिरा या दोन्ही ठिकाणांहून दादपर्यंत येणारी बससेवा सुरू करण्याची मागणी शिवसेना चित्रपट सेनेने केली होती.
या मागणीवर विचार करून ‘बेस्ट’ने ‘सी-१’ आणि ‘सी-२’ या दोन बस सुरू केल्या आहेत. यापैकी ‘सी-१’ ही बस मढ जेट्टीवरून वडाळा आगाराच्या दिशेने रवाना होईल. तर ‘सी-२’ ही बस गोरेगाव चित्रनगरीहून वडाळा आगाराला जाईल. या दोन्ही बस रात्री अडीच वाजता निघतील. मढ जेट्टीहून वडाळ्याला जाणारी बस १०० मिनिटांत ३४.५ किलोमीटर अंतर कापणार असून त्यासाठी किमान शुल्क ७ रुपये, तर कमाल शुल्क ३३ रुपये असेल. तर गोरेगाव चित्रनगरीहून निघणारी बस तासाभरात २५.२ किलोमीटर अंतर कापेल. या बसमध्ये किमान तिकीट ७ रुपये आणि कमाल तिकीट २९ रुपये असेल.
या दोन्ही बसचे उद्घाटन शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.