नीलेश अडसूळ, मुंबई

धोकादायक किंग्ज सर्कल पादचारी पूल बंद केल्यामुळे गैरसोय झालेल्या रहिवाशांना बेस्टच्या मोफत बस सेवेमुळे चांगलाच दिलासा मिळत आहे. अर्थात मोफत बस सेवेने दिलासा मिळाला असला तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढून पादचारी पुलाची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गरज रहिवाशी अधोरेखित करत आहेत.

किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक आणि गांधी मार्केट यांना जोडणारा पादचारी पूल धोकादायक ठरल्याने बंद करावा लागला आहे. मात्र हा महत्त्वाचा पूल बंद केल्याने रस्ता ओलांडणे त्रासदायक ठरते आहे. वाहनांची मोठय़ा संख्येने ये-जा असलेल्या या रस्त्यावर पालिकेने सुरू  केलेल्या मोफत बेस्ट बस सेवेमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किंग्ज सर्कल ते गांधी मार्केट या दरम्यान दिवसाला तब्बल ११० फेऱ्या होतात. किंग्ज सर्कल स्थानकापासून रस्ता ओलांडण्याची दक्षिणेला अरोरा जंक्शन येथे यावे लागते. तर उत्तरेस मानव सेवा संघ येथे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अपंग यांकरिता हे अंतर पायी कापण्याजोगे नाही. त्यामुळे बेस्टच्या सहकार्याने पालिकेने ही सेवा सुरू केली आहे. सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत बससेवा दिली जाते. दर पंधरा मिनिटांनी एक फेरी यानुसार दोन गाडय़ांच्या तब्बल एकशेदहा फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीत शंभरहून अधिक नागरिक याचा लाभ घेत असल्याची माहिती बेस्ट अधिकाऱ्यांनी दिली. या सेवेचा मोठा फायदा शाळकरी मुलांना व पालकांना होत आहे.

पाऊस जास्त झाला तर या भागात खूप पाणी साचते. अशा वेळी बससेवा बंद झाली तर मुलांच्या शाळेवर परिणाम होईल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली. बससेवेमुळे दिलासा मिळाला असला तरी बसच्या एका फेरीत दहा ते पंधरा मिनिटे जातात. हेच अंतर पादचारी पुलाचा वापर केला असता काही मिनिटांत पार होते. त्यामुळे पादचारी पूल सोयीचा व वेळेत पोहोचवणारा असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली.

पोलिसांचे सहकार्य

या भागातून जवळच्या अंतरासाठी टॅक्सी उपलब्ध होत नाही तर किंग्ज सर्कल स्थानकाच्या दोन्ही बाजूस शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि गांधी मार्केटसारखे व्यापाराचे ठिकाण असल्याने नागरिकांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. शीव-पनवेल महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे रहदारीच्या वेळी भररस्त्यात बस थांबल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होऊ  लागली आहे. परंतु पोलीस प्रशासन यामध्ये सक्रिय सहभागी होऊन पालिकेला सहकार्य करत आहे. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ  नये यासाठी अधिक क्षमतेचे जास्तीत जास्त पंप वापरून रस्ते कोरडे ठेवण्याची तरतूद केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.