• वातानुकूलित प्रवासासह मासिक पासही स्वस्त होणार
  • मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रवासी संख्या आणि उत्पन्न घसरत असल्याने बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने प्रवास भाडय़ाच्या टप्प्यात सुसूत्रीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. यामुळे येत्या काळात प्रवास भाडेटप्प्यात ८, १२, १७, २५, ३५, ४५ या टप्प्याचा समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिक पासही स्वस्त होणार आहे. त्यामुळे शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळलेले प्रवासी बेस्टकडे आकृष्ट होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र महापालिकानंतरही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या वर्षभरात बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी दोनदा भाडेवाढ करण्यात आली. मात्र यांमुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. दोन वर्षांपूर्वी ३५ लाखांवर असणारी बेस्टची प्रवासी संख्या २८ लाखांवर घसरली. त्यामुळे तिकीट दर वाढवून काहीच फायदा झालेला नसल्याने बेस्टच्या भाडेसूत्रात बदल करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. यात काही दिवसांपूर्वी बेस्टच्या प्रवासी भाडे टप्प्यात वाढवणे, वातानुकूलित बस गाडय़ांचे प्रवासी भाडे कमी करणे आणि मासिक पास स्वस्त करणे अशा बाबी पुढे आल्या. याला मंगळवारी पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली.

प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ निर्णय

बेस्टपासून दुरावलेल्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी पॉइंट टू पॉइंट सेवा, आनंद यात्री योजना, ई-पर्स योजनेअंतर्गत ५० रुपये शिल्लक ठेवण्याची अट रद्द, कमिशन तत्त्वावर बसगाडय़ांचे आरक्षण. मुंबई महानगर पालिका हद्दीबाहेरील बस सेवेवरील अतिरिक्त प्रवासभाडे रद्द करण्याच्या प्रस्तावाला पालिका सभागृहात मंजुरी मिळाली.

मासिक पास स्वस्त होणार

सध्या प्रवाशांकडून २२ दिवसांच्या तिकिटांवर मासिक पास आकारला जातो. आता हेच तिकीट २४ दिवसांवरून आकारले जाणार आहे. म्हणजेच ६६ दिवसांच्या तिकिटाच्या शुल्कावर प्रवाशांना ९० दिवस प्रवास करता येणार आहे. याचप्रमाणे मॅजिक बस पासाचेही पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे.

१५० बसगाडय़ा भाडेतत्त्वावर!

बेस्ट प्रशासनाकडून ५० वातानुकूलित, ५० साध्या (मोठय़ा) आणि ५० छोटय़ा गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार चाचपडून पाहिला जात आहे. याबाबतची निविदा प्रक्रियेसाठी येत्या दोन आठवडय़ांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यास विरोध केला जात आहे. याबाबत आज, बुधवारी वडाळा आगाराबाहेर निदर्शने करण्यात येणार असून त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल, असे युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

प्रस्तावित प्रवासभाडे

कि.मी.  प्रौढभाडे सवलत भाडे

२      १५/    ७

४      २०/    १०

६      २५/    १२

१०     ६५/    ३०