News Flash

‘तुटपुंजी वाढ नको, तर अर्ज भरा’

बेस्ट उपक्रम व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीत सामंजस्य करारावरून संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कृती समितीचा पुढाकार; बेस्टच्या सर्व आगारांमध्ये अर्जाचे वाटप

बेस्ट उपक्रम व बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीत सामंजस्य करारावरून संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या करारातील वेतनवाढ व अन्य मुद्दे शिवसेना व भाजपप्रणीत संघटनांना मान्य असल्याचे सांगितले जात होते. परंतु बेस्ट कर्मचारी असलेल्या या दोन संघटनांच्या सदस्यांना तुटपुंजी वाढ नको असेल, तर बेस्ट उपक्रमाला तसा अर्ज सादर करण्यासाठी प्रत्यक्षात कृती समितीनेच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी समितीकडून बेस्टच्या सर्व आगारांमध्ये अर्जाचे वाटप केले जात असून काही सदस्यांनी तसे अर्जही सादर केल्याचा दावा केला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार मिळत नसलेले वेतन व इत्यादी मुद्दय़ांवरून बेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या सामंजस्य कराराला बेस्ट वर्कर्स युनियन व अन्य संघटनांची मिळून असलेल्या बेस्ट संयुक्त कामगार कृतीने विरोध केला आहे. त्याविरोधात ९ ऑक्टोबरपासून संपाचाही इशारा दिला आहे. मात्र शिवसेना व भाजपप्रणीत दोन संघटनांनी बेस्ट उपक्रमाचा सामंजस्य करार मान्य केला आहे. या संघटनांचे सदस्य असलेल्या ९ हजार कर्मचाऱ्यांना तो लागू होईल व अन्य संघटनांच्या सदस्यांना मान्य असेल तर तो लागू करण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे दिला जाणारा अर्ज भरावा लागणार आहे.

परंतु जबरदस्तीने सामंजस्य करार सदस्यांना लागू करणाऱ्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना व भाजपप्रणीत संघटनेच्या सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने घेतला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट आगारांमध्ये अशा अर्जाचे वाटप केले जात आहे. असे बरेच अर्ज सादर झाल्याचा दावा राव यांनी केला आहे. या अर्जात नाव, पदनाम, वेतन पृष्ठ क्रमांक, आगार व आस्थापना, विभाग व ज्या कामगार संघटनेचा सभासद आहे त्या संघटनेचे नाव असे नमूद आहे.

आम्हाला सामंजस्य करार मान्य नाही. त्यामुळे आमचे सदस्य असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रश्नच नाही. ज्या सदस्यांवर कराराची जबरदस्ती केली जात आहे व तुटपुंजी वेतनवाढ नको, त्यांना एका अर्जाचे वाटप केले जात आहे. त्या सदस्यांनी अर्ज भरून बेस्ट उपक्रमाला सादर करायचा आहे.

– शशांक राव, नेते, कृती समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:37 am

Web Title: best bus worker akp 94
Next Stories
1 रेल्वे पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’
2 ‘आरे’चे वारे बाधणार?
3 निकाल आल्यानंतर समसमान वाटप म्हणजे काय हे कळेल : उद्धव ठाकरे
Just Now!
X