रोजच्या बसथांब्यावर बेस्ट बसचा मागमूस नाही.. प्रवाशांची रांग मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत चाललेली.. टॅक्सी-रिक्षाचालकांनी वाढवलेले भाडे.. या त्रराशिकात अडकलेल्या मुंबईकरांना मंगळवारी अक्षरश बेजार केले. कॅनेडियन वेळापत्रकाच्या निषेधार्थ बेस्टच्या तब्बल २६ हजार चालक-वाहकांनी संप पुकारल्याने मुंबईकरांच्या हालाला पारावार उरला नव्हता. तात्काळ कामावर रुजू होण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशालाही चालक-वाहकांनी भीक घातली नाही. आज, बुधवारीही कॅनेडियन वेळापत्रकावरून निर्माण झालेला हा तिढा कायम राहणार आहे. त्यातच भर म्हणून उपनगरांत रिक्षाही रस्त्यावर उतरणार नसल्याचे संकेत आहेत.
बेस्ट वाहक-चालकांचे जुने वेळापत्रक रद्द करून १ एप्रिलपासून कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या वेळापत्रकामुळे प्रत्यक्षात कामाचे तास वाढण्याची आणि अतिरिक्त ताण पडण्याची भीती व्यक्त करीत चालक आणि वाहक मंगळवारी कामावरच आले नाहीत. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये बेस्टच्या ताफ्यातील तब्बल ३४३५ बसगाडय़ा २५ आगारांतून बाहेर पडू शकल्या नाहीत. मात्र पोईसर, कुलाबा आगारांतून अनुक्रमे चार व दोन, तर विक्रोळी आणि वांद्रे बस आगारांमधून प्रत्येकी एक बस सोडण्यात आली. चारकोप सेक्टर-८ येथून निघालेल्या बसवर एका प्रवाशाने केलेल्या दगडफेकीत मोतीलाल चौहान नावाचा बसचालक जखमी झाला.     

आंदोलन चिघळणार?
चालक-वाहकांच्या आंदोलनाविरोधात बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र वाहक आणि चालक कामावर जाण्यास तयार नसल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईकरांना बुधवारीही इच्छितस्थळी जाण्यासाठी बेस्ट बस मिळणे अवघडच आहे.

टेम्पो-ट्रकमधून प्रवास करा
चालक-वाहकांच्या गैरहजेरीमुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहने, टेम्पो, ट्रकमधून प्रवासी वाहतूक करण्यास परिवहन आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने नागरिकांना इच्छितस्थळ गाठता येणार आहे.बसगाडय़ा आगारातच अडकून पडल्याने बेस्ट प्रशासनाने परिवहन आयुक्तांशी संपर्क साधून मुंबईकरांना प्रवासासाठी पर्याय उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यानुसार ट्रक, टेम्पो आणि खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परिवहन आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे बुधवारी आंदोलन सुरूच राहिले तरी मुंबईकर प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

५००३ वाहकांपैकी १९ जण कामावर
४७६५ चालकांपैकी २२ जण कामावर
२४४७ पैकी केवळ दोनच बस रस्त्यावर