स्वतंत्र मार्गिकेच्या मागणीला सरकारी यंत्रणांचाच खोडा

वाहतूक कोंडी, रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने यामुळे बेस्ट बसच्या फेऱ्यांवर परिणाम होत असून मोठय़ा प्रमाणावर इंधनही खर्ची पडत आहे. शक्य त्या भागात रस्त्यालगत वाहने उभी करण्यास मनाई करून बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्याच्या मागणीकडे सरकारी यंत्रणांनीच दुर्लक्ष केल्यामुळे बेस्टचा तोटा हळूहळू वाढत गेला आहे, तर दुसरीकडे बस भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांनी बेस्टच्या बसकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. यामुळे बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. पालिकेने सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये बेस्ट समिती आणि कामगार संघटनांनीच खोडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डबघाईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या बेस्टची परिस्थिती अवघड बनली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये बेस्टचा आर्थिक डोलारा डळमळू लागला आहे. मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे ओरड सुरू झाली आणि सर्वाचे लक्ष बेस्टकडे केंद्रित झाले. मात्र तोपर्यंत बेस्टकडे कुणाचेच लक्ष नव्हते.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. वाहनमालक रस्त्यावर मिळेल तिकडे वाट्टेल तशी वाहने उभी करू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे त्यांचा वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होऊ लागला आहे.

वाहतूक कोंडी होऊन वाहनांचा खोळंबा होऊ लागला आहे. हे चित्र मुंबईमधील अनेक विभागांमध्ये पाहायला मिळते. याचा परिणामही बेस्टच्या बसवर झाला आहे. वाहतूक कोंडीत रखडल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर इंधन खर्च होत आहे, तर दुसरीकडे वाहतूक कोंडीत अडकल्याने बराच वेळ वाया जात असून परिणामी बसच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. वाहतूक कोंडीमध्ये बस अडकल्यामुळे पुढच्या थांब्यांवर खोळंबलेले प्रवासी टॅक्सी अथवा रिक्षाचा पर्याय निवडू लागले आहेत.

बेस्टने स्वत:ला सावरण्यासाठी भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांनी शेअर टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडला असून त्याचाही फटका बेस्टला बसला आहे.

महसूल घसरला, खर्च वाढला

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शक्य त्या विभागातील रस्त्यालगत वाहने उभी करण्यास मनाई करावी आणि ती मार्गिका बेस्टच्या बसगाडय़ांसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी बेस्टकडून वारंवार करण्यात येत होती; परंतु या मागणीकडे सरकारी यंत्रणांनीच दुर्लक्ष केले, त्यामुळे बेस्ट बसच्या फेऱ्या कमी झाल्या, इंधनावरील खर्च वाढला. परिणामी महसूल घसरला आणि खर्च वाढत गेला, अशी खंत बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

..तर तोटय़ाला आवर

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पूर्वी ऐन गर्दीच्या वेळी बसगाडय़ा ४० ते ५० मिनिटे रखडत होत्या. मात्र त्या भागात स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने आता बसच्या फेरीसाठी २० मिनिटे लागत आहेत. वेळ कमी झाल्याने आपोआप इंधनावरील खर्च कमी झाला आहे, तसेच वेळापत्रकानुसार बसगाडय़ांच्या फेऱ्याही होत आहेत. मात्र अशा पद्धतीने शक्य त्या भागात रस्त्यालगत वाहने उभी करण्यास मनाई करून बससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध केल्यास काही प्रमाणावर तोटय़ाला आवर बसेल, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.