यंदाच्या बेस्टच्या अर्थसंकल्पात किमान प्रवासभाडे कमी करण्याची सूचना बेस्ट प्रशासनाने फेटाळल्याने प्रवाशांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. बेस्टची प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी आणि शेअर रिक्षा-टॅक्सी यांच्याकडे गेलेले प्रवासी परत आणण्यासाठी समिती सदस्यांनी किमान प्रवासभाडे कमी करण्याबरोबरच प्रवासभाडय़ाची पुनर्रचना करण्याची सूचना केली होती. मात्र हे शक्य नसल्याचे सांगत प्रशासनाने ही सूचना धुडकावून लावली.

बेस्टने यंदाच्या फेब्रुवारी आणि एप्रिल या दोन महिन्यांत एक-एक रुपयाची वाढ केली आहे. त्यामुळे किमान प्रवासभाडे सहा रुपयांवरून आठ रुपये झाले आहे. त्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत सातत्याने घट होत असून प्रवासी शेअर रिक्षा किंवा टॅक्सी यांकडे वळल्याचे दिसत आहे. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी उत्पन्नावरही झाला असून २०१४-१५च्या तुलनेत २०१५-१६ या वर्षांत प्रवासी उत्पन्न २१८ कोटी रुपयांनी कमी झाले.

‘आकडेमोडीच्या खेळात’ अर्थसंकल्प मंजूर
अर्थसंकल्प सादर करताना बेस्ट प्रशासनाने महापालिकेकडून गृहीत धरलेले ३५५ कोटी रुपयांचे अनुदान प्रशासनाच्या अंगलट आले. बेस्ट अर्थसंकल्पीय चर्चेच्या दुसऱ्या दिवशी समितीच्या बैठकीत उपस्थित राहिलेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी असे अनुदान महापालिका अर्थसंकल्पाच्या मंजुरीशिवाय देता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर घाईघाईत हा ३५५ कोटी रुपयांचा आकडा इतर खात्यांवर दाखवत बेस्ट प्रशासनाने हा अर्थसंकल्प मंजूर करवून घेतला.