वीज ग्राहकांनी भरलेल्या देयकांचा बँकेत भरणा नाही

मुंबई: बेस्टचा विद्युत विभाग दोन वर्षांत तोट्यात जाईल, असा अंदाज अर्थसंकल्पात वर्तवलेला असला तरी बेस्टच्या अधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. वीज ग्राहकांनी गेल्या दहा दिवसांत भरलेले २१ कोटींचे धनादेश अद्याप बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात पडून आहेत. हे धनादेश जमा करण्याचे काम रोख विभाग आपल्याकडे घेत नसल्यामुळे बेस्टचे व्याजापोटी मोठे नुकसान होत आहे.

२०२१-२२ च्या अर्थसंकल्प अंदाजात विद्युत विभागात २६३ कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. बेस्टचा परिवहन विभाग आधीच डबघाईला आलेला असताना विद्युत विभागालाही घरघर लागण्याची चिन्हे आहेत. ग्राहकांनी भरलेली विजेच्या देयकांची रक्कम व धनादेश हे गेल्या काही दिवसांपासून बेस्टकडे पडून असल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर बेस्टच्या रोख विभागाने वीज बिल भरणा केंद्रातील रोख रक्कम आपल्याकडे जमा करण्यास सुरुवात केली. मात्र ग्राहकांनी दिलेले धनादेश स्वीकारण्यास रोख विभागाने नकार दिल्याचे विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासूनचे सर्व धनादेश पडून आहेत. हे धनादेश वेळेत न वटल्यास त्याच्या व्याजापोटी मिळणाऱ्या रकमेवरही बेस्टला पाणी सोडावे लागेल. ज्या ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने बिल भरता नाही आले ते ग्राहक रोख रक्कम भरतात. तर ज्या कंपन्यांची बिले ही लाखांमध्ये असतात, असे ग्राहक धनादेशाने बिल भरतात. त्यात गेल्या तीन महिन्यांतील रखडलेल्या वीज बिलांचा ओघ बेस्टकडे वाढला आहे. मात्र तो स्वीकारण्यासाठी बेस्टकडे यंत्रणा व मनुष्यबळ नाही. त्यामुळे सध्या पडून असलेल्या धनादेशातील रक्कम मोठी आहे.

झाले काय?

बेस्टच्या तिकीट विक्रीतून व वीज बिलातून येणारी रक्कम आणि धनादेश बँकेत जमा करण्यासाठी आयआयसीआय बँकेबरोबर केलेला करार संपल्यामुळे रोजच्या रोज ही रक्कम हाताळणे मुश्कील होऊ लागले आहे. बेस्टच्या परिवहन आणि विद्युत पुरवठा विभागात दररोज चारपाच कोटींची रक्कम जमा होते. मोठ्या संख्येने आलेले धनादेश बँकेत भरण्याचे काम करण्यास रोख विभागाची तयारी नाही, तर विद्युत विभागाकडे त्यासाठी मनुष्यबळ नाही. त्यामुळे धनादेश बेवारसपणे पडून आहेत. थोडक्यात बेस्टकडे पैसा येत असला तरी तो हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांना उपाययोजना करता आलेल्या नाहीत.