सहा किमीपुढील तिकीट दरवाढीला बेस्ट समितीची मंजुरी

आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्टला तारण्याकरिता प्रवाशांच्या खिशालाच हात घालण्यात येणार असून बेस्ट प्रशासनाने बस तिकीट आणि पास दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बसभाडे आणि पास दरवाढीला मंगळवारी बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बेस्ट तिकिटाकरिता एक ते १२ रुपये आणि मासिक पासासाठी ४० ते ३५० रुपये प्रवाशांना जास्त मोजावे लागणार आहेत. तिकीट व पासांतील वाढ ही सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी लागू होईल. अर्थात मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच बेस्ट भाडेवाढ लागू होईल, असे बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आले.

गेल्या काही वर्षांत बेस्टला मोठय़ा आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागत आहे. २०१४-१५ मध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांपर्यंत असलेला बेस्टचा अर्थसंकल्प कालांतराने आक्रसत केला. आता तो पाच हजार ८२४ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बेस्टची तूट ३०० कोटी रुपयांनी वाढली आहे. यातून सावरण्यासाठी बेस्टला पालिकेबरोबरच राज्य सरकारकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची अपेक्षा होती. परंतु त्यांच्याकडून मदत न मिळाल्याने अखेर बेस्टसमोर भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

बेस्ट समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सहा किलोमीटर अंतरापुढील तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बसच्या तिकीट भाडय़ात एक ते १२ रुपये आणि पासांत ४० ते ३५० रुपयांची वाढ होईल. शालेय बस पासचे दरही बेस्टकडून वाढविण्यात येणार आहेत. ही वाढ ५० ते १०० रुपयांपर्यंत असेल. बेस्टचा खर्च कमी करण्यासाठी बसचा गाडय़ांचा ताफा कमी करण्याचाही प्रस्ताव होता. तसेच जुन्या एक हजार ७०३ बस मोडीत काढून एक हजार २५० बस भाडेतत्त्वावर घेण्याचाही समितीचा विचार आहे. याला मात्र बेस्ट समितीकडून विरोध दर्शविण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्ट प्रशासनाला काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यानुसार कामगार, अधिकाऱ्यांचे भत्ते गोठवण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता, वैद्यकीय भत्ता, वह्य़ा-पुस्तके खरेदी भत्ता, शिष्यवृत्ती योजना, रजेचे रोखीकरण, प्रोत्साहन भत्ता, अधिकारी प्रवास भत्त्यांचा यात समावेश आहे. मात्र महागाई भत्ता, रजा-प्रवास भत्ता, वाहतूक भत्ता, अर्थसहाय्य भत्ता या गोष्टी वगळण्यात आल्या आहेत.  मात्र, बेस्टने कर्मचारी कपातीकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर विविध घटकांना दिलेल्या सवलतींचाही फेरविचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडूनही या भाडेवाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

पासांत वाढ, दैनंदिन पास बंद

दरवाढीनंतर सध्या ७० रुपये, ५० रुपये आणि ४० रुपये असलेला पास अनुक्रमे ९० रु, ६० आणि ५० रुपये होईल. सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत चालणाऱ्या दैनंदिन पासाची आनंदयात्री योजनादेखील बंद करण्यात येणार आहे. मासिक पास दरांतही वाढ होणार असून सहा किलोमीटर अंतराच्या मासिक पासचे भाडे ६२० रुपयांवरून ६६० रुपये आणि २० किलोमीटरच्या पासासाठी १ हजार ५०० रुपये मोजावे लागतील. तर पाचवी आणि दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पासदर मासिक १५०, २०० आणि २५० रुपये, त्रमासिक पास ४५० रुपयांवरुन ६०० आणि ७५० रुपये असे वाढविण्यात येतील.