वांद्रे ते बोरिवली दरम्यान एसटीने सुरू केलेली एसी बसची सुरुवात तसेच बीकेसीमध्ये एमएमआरडीएने बससेवा सुरू करण्याची केलेली घोषणा यासंबंधी बेस्ट समितीमध्ये गुरुवारी नाराजी व्यक्त करण्यात आली.
बेस्ट उपक्रम एकीकडे तोटय़ात जात असताना नफा देणाऱ्या मार्गावर फेऱ्या चालवण्यास इतर संस्थांना बंदी करायला हवी, असे मत काही समिती सदस्यांनी मांडले. मात्र जागतिकीकरणाच्या काळात प्रवाशांवर एकाधिकारशाही करण्यात अर्थ नाही, त्याऐवजी बेस्टने कामगिरीत सुधारणा केली पाहिजे, असेही मत समितीत व्यक्त करण्यात आले.
एसटीने सुरू केलेली सेवा ही पॉइंट टू पॉइंट एसी बस सेवा असून कॉर्पोरेट वर्गासाठी आहे. त्याशिवाय बीकेसी येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी एमएमआरडीएला बसफेऱ्या सुरू करायच्या असून ते मार्ग चालवण्याची विनंती त्यांनी बेस्टलाही केली आहे, असे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता म्हणाले.