एका हाताने हॅण्डल पकडून, तोल सावरत, पर्समधून पैसे काढून तिकीट मागण्याची कसरत करत असतानाच कधीतरी नकोसा स्पर्श होतो.. गर्दीमुळे झाले असेल असे वाटून दुर्लक्ष करावे तर पुन्हा काही सेकंदाने धक्का लागतो.. मग डोळ्याच्या कोनातून मागे बघत पुढे कुठे जागा आहे का ते शोधले जाते.. बेस्टच्या गर्दीच्या बसमधून प्रवास करताना बहुसंख्य महिला हा अनुभव अनेकदा घेतात. आता मात्र बेस्टमधील वाहक (कंडक्टर) महिलांच्या मदतीला येणार आहेत आणि त्यासाठी बेस्ट प्रशासन त्यांना विशेष अधिकारही देणार आहेत. बसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्याला बसमधून खाली उतरवण्याचा, एवढेच नव्हे तर महिलेची तक्रार करण्याची तयारी असल्यास बस पोलीस स्टेशनपर्यंत नेण्याचेही अधिकार वाहकाला असतील.
बेस्टचे वाहक त्यांच्या इतर कामांच्या व्यापातही महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतात. आता त्याला बेस्ट उपक्रमाचेही पाठबळ मिळणार आहे. महिलांसाठी काम करणारी अक्षरा संस्था आणि बेस्ट उपक्रम यांनी संयुक्तपणे ‘त्वरिता मोहीम’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात सात जुलै रोजी होत असून शहराच्या सर्व बेस्ट आगारांमध्ये या मोहीमेसंदर्भात बेस्टचालक, वाहक, निरीक्षक यांची जागृती यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचार म्हणजे काय, गैरवर्तनाबाबतचे गैरसमज व सत्य, लैंगिक गैरवर्तनाची खरी कारणे यासंबधीची पुस्तिका, महिला गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाहकाची भूमिका व अधिकार सांगणारी मार्गदर्शिका तसेच भित्तीपत्रके या मोहिमेदरम्यान वाटण्यात येणार आहेत.
बेस्ट बस पोलिस स्टेशनमध्ये आल्यास लवकर तक्रार दाखल करून बसमधील प्रवाशांना जाऊ द्यावे, याबाबत पोलिसांशीही चर्चा करण्यात आली आहे. मात्र अनेकदा महिला तक्रार करत नाहीत. त्यामुळे गैरवर्तन आढळल्यास वाहकाला पुढाकार घेऊन संबधिताला समज देण्याचा अधिकार वाहकाला असेल.
मार्गदर्शिकेत काय आहे?
*महिला तक्रार करत नाहीत, त्यामुळे वाहकांनी अशा घटनांवर नजर ठेवावी.
*संशय आल्यास संबंधित पुरुषाला थोडे दूर उभे राहण्यास सांगावे.
*घटना घडल्यास गैरवर्तन करणाऱ्याला समज द्यावी.
*बस थांबवण्याचा व संबंधित प्रवाशाला बसमधून उतरवावे.
*पोलिसात तक्रार करण्याची महिलेची तयारी असल्यास बस प्रवाशांसह पोलिस स्टेशनकडे वळवावी.

महिलांना मदत करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले पाऊल उचलले आहे. बेस्टचे वाहक महिलांच्या मदतीला येणार आहेत. आता महिलांनीही पुढे येऊन गैरवर्तनाची तक्रार केली पाहिजे. बेस्ट वाहकाने गैरवर्तन करणाऱ्याला जाब विचारल्यास महिलेनेही मौन सोडायला हवे. त्याचसोबत इतर प्रवाशांनीही बेस्ट वाहकाच्या बाजूने उभे राहायला हवे.
– उर्मिला साळुंखे, कार्यकर्त्यां, अक्षरा संस्था