बेस्टच्या कामगारांनी मंगळवारी सकाळपासून काम बंद ठेऊन पुकारलेला संप बुधवारी दुपारी मागे घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्यासोबत कामगार संघटनेचे नेते शरद राव आणि इतर नेत्यांची बैठक झाल्यावर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेस्ट वाहक-चालकांचे जुने वेळापत्रक रद्द करून १ एप्रिलपासून कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या वेळापत्रकामुळे प्रत्यक्षात कामाचे तास वाढण्याची आणि अतिरिक्त ताण पडण्याची भीती व्यक्त करीत चालक आणि वाहक मंगळवारी कामावरच आले नाहीत आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कॅनेडियन वेळापत्रकात आवश्यक ते बदल करून एक जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यापूर्वी कामगार संघटनांचे मतही विचारात घेतले जाईल, असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. मुख्य सचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेस्टचे ओमप्रकाश गुप्ता आणि कामगार संघटनेचे शरद राव यांच्यात दुपारी बैठकी झाली परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. यामध्ये अंतिम तोडगा राज्याचे मुख्यसचिव काढतील, असे ठरले. त्यानुसार मुख्य सचिवांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून काम बंद आंदोलन मागे घ्यायला लावले.