वाढीव वीज बिले चुकीची नसल्याचा दावा; नव्या दरपत्रकानुसार १० ते २० टक्क्यांपेक्षा जास्त दर
मुंबई शहर आणि उपनगरांत राहणाऱ्या आणि बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना या महिन्याचे तब्बल दामदुपटीने वाढलेले वीज बिल बघून बसलेला झटका असाच कायम राहणार आहे. एमईआरसीच्या नियमांप्रमाणे बेस्टचे नवीन दरपत्रक १ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. मात्र याआधी वीज बिलांमधील इंधन समायोजन आकार आता वजा केला जात नसल्याने या वेळचे वीज बिल जास्त आले आहे. या दोन गोष्टींच्या परिणामांमुळे बेस्टचे वीज बिल यापुढील महिन्यांतही असेच २० ते ३० टक्के जास्त येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी नवी वीज बिले सदोष नसून वाढीव रक्कम ही अनेक घटकांचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यापासून बेस्टच्या वीज बिलांसाठी नवे दरपत्रक लागू झाले आहे. या दरपत्रकानुसार विजेचे दर १० ते २० टक्के एवढे वाढले आहेत. तर सप्टेंबर महिन्यापासून इंधन समायोजन आकारापोटी काही रक्कम वीज बिलांमधून परस्पर वगळण्यात येत होती. ही रक्कम साधारण १० ते २० टक्केएवढी होती. त्यामुळे दोन हजार रुपये बिल झालेल्या ग्राहकांना त्याआधी फक्त १८०० रुपयांचे बिल मिळत होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.सप्टेंबर महिन्यात वीज बिल प्रक्रियेत झालेल्या बिघाडामुळे ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल देण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याच्या बिलात त्याची सुधारणा होताना ग्राहकांना कमी रकमेचे बिल मिळणे अपेक्षित होते. मात्र हे दोन घटक लागू झाल्याने ग्राहकांचे वीज बिल थेट ४० ते ५० टक्क्यांनी जास्त आले आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. या बाबतची माहिती ग्राहकांना देण्यासाठी आता वीज बिलासह माहितीपत्रक पाठवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र यापुढील प्रत्येक महिन्यात ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार साधारण तेवढय़ाच रकमेचे बिल मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ग्राहकांच्या हाती पडलेल्या वीज बिलातील आकडे पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. याआधी हजार ते दीड हजार बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या हाती तीन ते चार हजार रुपयांची बिले पडल्याने वीज बिलांमध्ये नक्कीच काही तरी दोष असावा, अशी ग्राहकांची धारणा झाली आहे.