ऑक्टोबर हीटच्या काळात सप्टेंबर महिन्याचे बेस्टचे विजेचे बिल हातात पडल्यानंतर तुम्हाला झटका बसला तर नवल वाटायला नको. कारण परिवहनाच्या बाबतीत बट्टय़ाबोळ झालेल्या बेस्ट प्रशासनाच्या विद्युत विभागातही खेळखंडोबा सुरू आहे. बेस्टच्या वीज बिल तयार करण्याच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा ‘डाटा करप्ट’ होण्याचा प्रकार घडला असून त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचे वीज बिल तयार करताना गेल्या तीन महिन्यांच्या वीज बिलांच्या रकमेची सरासरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पदरी पुन्हा एकदा जादा रकमेचे बिल पडेल. मात्र ग्राहकांनी हे वीज बिल भरावे, या रकमेची तडजोड पुढील बिलात केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.
बेस्टचे वीज बिल तयार करण्याचे काम बाहेरील संस्थेला दिले आहे. बेस्टने वीज बिल तयार करण्यासाठी अंतर्गत यंत्रणा उभारण्याकडे लक्ष दिलेले नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यात बेस्टच्या वीज बिल प्रक्रियेत डाटा करप्ट झाला होता. त्यामुळे वीज बिले तयार होऊ शकली नव्हती. परिणामी जानेवारी महिन्यात लोकांच्या हाती भल्यामोठय़ा रकमेची वीज बिले पडली होती. जून महिन्यात प्रचंड पाऊस पडला, त्या वेळीही अशाच परिस्थितीला बेस्ट प्रशासनाला सामोरे जावे लागले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलाची रक्कमही गेल्या तीन महिन्यांच्या बिलाच्या रकमेच्या सरासरीने काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
याबाबत बेस्ट समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी प्रशासनावर अनेकदा ताशेरे ओढले होते. बेस्टकडे स्वत:चे माहिती तंत्रज्ञान धोरण नाही. माहिती तंत्रज्ञानासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी बेस्ट प्रशासन इतरांवर अवलंबून आहे. तसेच बेस्टच्या याबाबतीतील उदासीनतेचा फायदा घेत बेस्टचे आíथक नुकसान करणारे लोकही खूप आहेत. बेस्टच्या वीज ग्राहकांना एका वर्षांत तीन वेळा अशा समस्येला सामोरे जावे लागावे, ही प्रशासनासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. परिवहन विभागात तर बेस्टचे अपरिमित नुकसान होत आहे. या नुकसानाला सावरणाऱ्या विद्युत विभागाचा कारभारही गलथान झाल्यास उपक्रमावर बिकट वेळ येईल, असा इशारा होंबाळकर यांनी दिला.
याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांना विचारले असता, तांत्रिक बिघाड झाला असला, तरी ग्राहकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी प्रशासन घेईल, असे त्यांनी सांगितले.
वीज बिल तयार करण्याच्या प्रक्रियेत बेस्ट स्वयंपूर्ण होण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. पुढील काही महिन्यांत वीज बिल तयार करण्यासाठी आम्हाला इतरांचे साहाय्य लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.