News Flash

वीजग्राहकांना २०० कोटींचा भुर्दंड

आतापर्यंत टाटा वीज कंपनीकडून खरेदी केलेली वीज बेस्ट आपल्या ग्राहकांना पुरवत आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

बेस्टच्या घोळामुळे स्वस्त वीजखरेदीची प्रक्रिया रखडली

मुंबई शहराला वीजपुरवण्यासाठी सध्यापेक्षा स्वस्त दराने वीजखरेदी करण्याच्या चांगल्या हेतूने बेस्ट उपक्रमाने स्पर्धात्मक निविदा मागवल्या खऱ्या; पण नंतर टाटा पॉवर कंपनीसह झालेल्या वादातून आता ही प्रक्रियाच थांबली आहे. वीज खरेदीसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना गुरुवारी राज्य वीज नियामक आयोगाने बेस्टला केली. त्यामुळे मुंबईकरांसाठी स्वस्त वीज खरेदी लांबणीवर पडणार असून महाग विजेपोटी ग्राहकांवर सुमारे २०० ते ४०० कोटी रुपयांचा भुर्दंड पडण्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत टाटा वीज कंपनीकडून खरेदी केलेली वीज बेस्ट आपल्या ग्राहकांना पुरवत आली आहे. मात्र वीज नियामक आयोगाच्या नियमाचा आधार घेत बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागाने खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१८ पासून पुढील पाच वर्षांसाठी वीज खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या. बेस्टने २४ तासांसाठी ३०० मेगावॉट, सकाळी ७ ते रात्री ११ या काळासाठी २५० मेगावॉट आणि सकाळी ७ ते रात्री ९ या काळासाठी २५० मेगावॉट  अशी तीन टप्प्यांत वीज खरेदी करण्याचे ठरवले. त्यादृष्टीने निविदा तयार करण्यात आल्या होत्या. २४ तासांसाठीच्या ३०० मेगावॉटपैकी १०० मेगावॉट विजेचा पुरवठा ३ रुपये ५७ पैसे प्रतियुनिट दराने करण्याची तयारी धारिवाल कंपनीने दर्शविली. तर ३ रुपये ८२ पैसे दराने २०० मेगावॉट वीज देण्यास अदानी कंपनी तयार झाली. बेस्टची पूर्वपरवानगी घेऊन टाटा समूहातील टाटा वीज कंपनी आणि टाटा ट्रेडिंग कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या. मात्र एकाच समूहातील दोन कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही या अटीवर बोट ठेवून बेस्टने टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना बाद केले. त्यामुळे टाटाच्या स्पर्धेत असलेली एकटी महावितरणच निविदा प्रक्रियेत उरल्याने स्पर्धा संपली. या पाश्र्वभूमीवर हा वाद राज्य वीज नियामक आयोगात गेला. गुरुवारी त्यावर सुनावणी झाली असता, वीज खरेदीसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना वीज आयोगाने केली आहे. त्यामुळे आता नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार असून एप्रिलपासून स्वस्त वीज मिळणे लांबणीवर पडणार आहे.

सध्या बेस्टला टाटाकडून सुमारे साडेचार रुपये प्रति युनिट दराने वीज मिळते. आताची प्रक्रिया सुरळीत पार पडली असती तर प्रति युनिट ७० पैसे ते एक रुपया स्वस्त दराने वीज मिळाली असती. एक वर्षांचा विचार करता मुंबईकरांचे सुमारे ४०० कोटी रुपये वाचले असते. पण आता निविदा प्रक्रिया होऊन वीजखरेदी करार होईपर्यंत सहा महिने ते वर्षभर पुन्हा टाटा पॉवरचीच वीज बेस्टला घ्यावी लागेल. टाटाने या कालावधीसाठी आतापेक्षा थोडा कमी दरही आकारला तरी मुंबईकरांवर २०० कोटी रुपयांचा भुर्दंड पडेल, असा इशारा वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी दिला आहे.

कंपन्यांमध्ये संगनमताची भीती

वीज खरेदीसाठी बेस्टला आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आधीच्या निविदा प्रक्रियेत इतर कंपन्यांचा दर उघड झाला आहे. त्यामुळे पुढील निविदेत वीजनिर्मिती कंपन्या संगनमताने विजेसाठी दर ठरवण्याची भीती आहे. बेस्टला खूप काळजीपूर्वक आता निविदा प्रक्रिया राबवावी लागेल, असा इशारा वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी दिला. नव्या वीजखरेदीला एप्रिल २०१९ उजाडले तर हा भुर्दंड ४०० कोटी रुपयांवर जाईल, असे पेंडसे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:46 am

Web Title: best electricity consumers best
Next Stories
1 विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कात कपात
2 दादरच्या पुलाखाली उद्यान, जॉगिंग ट्रॅक
3 फलाट-लोकल गाडय़ांमधील पोकळी भरणार
Just Now!
X