सहा महिन्यांचा भत्ता कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाला नाही

मुंबई : करोनाकाळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागांतील शेकडो कर्मचारी करोना भत्त्यापासून वंचितच राहिले आहेत. जुलै ते डिसेंबर या कालावधीतील हा भत्ता अद्यापही न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भत्त्याची एकू ण रक्कम ६० कोटी रुपये आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये राहिलेला भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल, असे आश्वासन बेस्ट उपक्र माकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही.

मार्च २०२० पासून टाळेबंदी जारी झाली. मात्र बेस्ट उपक्रमातील परिवहन, विद्युतसह अन्य विभागांतील अनेक कर्मचारी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी उपस्थित राहिले. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बस चालवतानाच श्रमिक तसेच परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनाही नियोजित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करावे लागले. हे काम करताना बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. त्यात काहींना जीवही गमवावा लागला.

करोनाकाळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाने दररोज ३०० रुपये करोना भत्ता देण्यास मंजुरी दिली होती. तशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. जूनपर्यंत हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर भत्ता देणे बंद झाले. डिसेंबपर्यंत कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जाईल, असे वारंवार आश्वासनही देण्यात येत होते. परंतु त्याचा विचार झाला नाही. हळूहळू टाळेबंदी शिथिल झाली आणि प्रवासीसंख्या वाढू लागताच कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणखी वाढत गेला. जानेवारी २०२१पासून भत्ता देण्याबाबत मात्र प्रशासनाने विचार केला नाही. परंतु त्याआधीचा जुलै ते डिसेंबपर्यंतचा करोना भत्ता तरी द्यावा, अशी मागणी आता कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

भत्ता वाढवून द्या!

डिसेंबर २०२० पर्यंत दररोज ३०० रुपये भत्ता देण्याचे प्रशासनाने मान्य के ले होते. त्यानुसार एप्रिल ते जून २०२० पर्यंत भत्ता मिळाल्यानंतर सहा महिने भत्ता मिळाला नाही. करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जानेवारीपासूून भत्ता देण्याबाबत काही निर्णय झाला नाही. सध्या कडक र्निबध लागू करण्यात आले असून या परिस्थितीतही बेस्ट सेवा देत आहेत. त्यामुळे पुन्हा करोना भत्ता सुरू करावा आणि आता तो  ५०० रुपये द्यावा, अशी  मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचा हक्क

जून २०२० पासून करोना भत्ता मिळालेला नाही. हा भत्ता कर्मचाऱ्यांना मिळायलाच हवा, अशी मागणी बेस्ट वाहक प्रशांत शिंदे यांनी के ली. सहा महिन्यांचा करोना भत्ता मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे बेस्टचे चालक अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले. याबाबत वारंवार आश्वासने दिली, परंतु अद्यापही तो मिळालेला नाही.

बेस्टमधील चालक, वाहकांसह अनेक आघाडीवरील कर्मचाऱ्यांना ३०० रुपये करोना भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मार्चपासून तीन महिने भत्ता दिल्यानंतर ऊर्वरित महिन्यांचा भत्ता अद्यापही दिलेला नाही. जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही एक प्रकारे थट्टाच के ली जात आहे. त्यांना भत्ता मिळालाच पाहिजे.

सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य (भाजप)