मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १५ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला असून बेस्ट कर्मचाऱ्यांचे डोळेही बोनसकडे लागले आहेत.

गेल्या वर्षीप्रमाणे बोनसची रक्कम वेतनातून कापून घेऊ नये अशी एकमुखी मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र बेस्टची डळमळीत झालेली आर्थिक स्थिती लक्षात घेता कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाकडून बोनस मिळू शकेल की नाही याबाबत साशंकताच आहे. मात्र बोनस मिळावा यासाठी कामगार संघटनांची सोमवारी रात्री बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी कामगार संघटनांकडे केली होती. पालिका मुख्यालयात महापौरांच्या दालनात झालेल्या वाटाघाटीअंती पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वृत्त समजताच बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. बेस्ट उपक्रमातील कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांना वेतनाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी बोनसपोटी दिलेले, मात्र नंतर वेतनातून कापून घेण्यात आलेले ५ हजार ५०० रुपये कर्मचाऱ्यांना परत द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. पालिकेपाठोपाठ बेस्टनेही कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करावा, असे कामगार नेते शशांक राव यांनी केली आहे.

गेल्यावर्षी बोनसला कात्री

आर्थिक स्थिती डळमळीत झाल्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देणे बेस्ट उपक्रमाला शक्य नव्हते. पालिकेने अटीसापेक्ष दिलेल्या निधीतून बेस्ट कर्मचाऱ्यांना पाच हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र त्यानंतर ११ हप्त्यांमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बोनसची रक्कम कापून घेण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. आता कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या २० टक्के बोनस मिळावा अशी मागणी केली असून प्रशासनाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सोमवारी रात्री कामगार संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.