दुरवस्थेत असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वसाहती सध्या फारच वाईट अवस्थेत असून त्यांचे संरचनात्मक परीक्षण करण्याची मागणी बेस्टमधील समिती सदस्यांनी सोमवारी बैठकीत केली. या मागणीला अनुसरून परळमधील वसाहतीची दुरवस्था असून त्याची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीच्या बैठकीत सादर केला. मात्र सदस्यांनी वसाहतीचे आयआयटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि इमारतीचा पुनíवकास करण्याची मागणी उचलून धरली.

परळमधील बेस्ट वसाहतीत १५ इमारती असून १९५७ साली त्यांचे बांधकाम झाले आहे. यामध्ये १ हजार ९६ घरे आहेत. येथील इमारतींची दयनीय अवस्था झाली असून अनेक इमारतींना तडे गेले आहेत. तर काही इमारतींचे स्लॅब पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.

त्यामुळे इमारतींच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. त्यानुसार इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून सोमवारी बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केला. यावेळी शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी वसाहतींची दुरवस्था झाली असून त्याची पाहणी करण्याची मागणी केली. भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी कर्मचाऱ्यांकडून जे भाडे वसूल केले जाते, त्याचे बेस्टला ४ कोटी ७४ लाख ६४ हजार ६५५ रुपये मिळतात. त्यापैकी फक्त १ कोटी खर्च हा दुरुस्तीवर केला जातो. तर ३ कोटी ७० लाख रुपये बेस्टकडे जमा असल्याचे सांगितले.

वसाहतींचा पुनर्विकास केला तर किती एफएसआय देता येईल, याची प्रशासनाने माहिती देण्याची मागणी गणाचार्य यांनी केली. शिवसेना सदस्य आशीष चेंबूरकर यांनीही आयआयटीकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची मागणी केली. बेस्ट प्रशासनाने मात्र ३० ते ३५ इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्यक्ता असल्याचे सांगून दोन टप्प्यांत ऑडिट करण्यात येत आहे. त्यानुसार इमारतींच्या दुरुस्तीकरिता निविदा काढण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बेस्ट समिती अध्यक्ष दिलीप पाटणकर यांनी परळ वसाहतीची प्रशासनाने पाहणी करावी आणि स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल काय येतो ते पाहून विशेष बैठक लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.