अत्यावश्यक सेवा देताना बेस्ट कर्मचाऱ्यांनाही करोनाचा सामना करावा लागत आहे. करोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाशी लढताना मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास बेस्ट उपक्रमात नोकरी देण्याचा निर्णय शुक्रवारी उशीरा घेण्यात आला.

बेस्टने काढलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू करोनामुळे झाला आहे, अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास बेस्ट उपक्रमात नोकरी दिली जाणार आहे. ही नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बेस्ट कामगाराची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एकाला नोकरी मिळेल.

बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपण एवढय़ावरच थांबणार नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, एक कोटी रुपयांचे विमासुरक्षा कवच आणि शहीद दर्जा देण्याबाबत, तसेच इतर प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.