१९ हजार कर्मचाऱ्यांचा संपाच्या बाजूने कौल

प्रलंबित वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळीचा बोनस आणि अन्य मागण्यांसाठी संप करण्याचा कौल बेस्टमधील १९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतदानाद्वारे दिला असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेस्टमध्ये संप होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्रशासनाला मागण्यांची पूर्तता करण्याचे स्मरण करून देण्यासाठी बेर्स्ट वर्कर्स संघर्ष कृती समितीतर्फे २६ ऑगस्ट रोजी बेस्टच्या वडाळा आगारामध्ये लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत संपुष्टात आली आहे. प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांचा नवा वेतन करावा, पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प विलीन करावा, कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस द्यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य काही प्रश्न धसास लावण्याची मागणी बेस्ट वर्कर्स संघर्ष कृती समितीने केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा संप करावा का यासाठी कृती समितीने शुक्रवारी कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले. कृती समितीने शनिवारी मतमोजणी केली. सुमारे १७ हजार ९२५ कर्मचाऱ्यांनी मतदान केले असून १७ हजार ४९७ म्हणजे ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला, तर ३६८ कर्मचाऱ्यांनी संप करू नये असे मत दिले, तर ६० मते अवैध ठरली. सुमारे १७३१ कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने मतदान करून आपला कौल कळविला होता. त्यापैकी एक हजार ५८६ कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या पारडय़ात मत टाकले, तर ९७ कर्मचाऱ्यांनी संपाला नकार दिला आहे. एकूण १९ हजार ०८३ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये बेस्ट उपक्रमात नऊ दिवस संप करण्यात आला होता. तत्पूर्वीही घेण्यात आलेल्या मतदानात १५ हजार २११ पैकी १४ हजार ४६१ कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता.

बेस्ट उपक्रमातील शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेना आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. नव्या वेतन करारामुळे बेस्टवर किती आर्थिक भार पडेल याचा आढावा घेऊन येत्या २७ ऑगस्ट रोजी वेतन करार करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.