बेस्ट व्यवस्थापनाचा निर्णय, समितीची मंजुरी मात्र आवश्यक

मुंबई : गेल्या वर्षीच्या दिवाळी बोनसची अद्यापही प्रतीक्षा असतानाच यंदा ९ हजार १०० रुपये बोनस देण्याचा निर्णय बेस्ट व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र त्यासाठी बेस्ट समितीची अंतिम मंजुरीही आवश्यक असून त्यानंतरच कर्मचाऱ्यांना लागू होऊ शकतो.

बेस्टमधील कामगार संघटनांनी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. गेल्या वर्षी ५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर केला होता, परंतु तो कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे बेस्टच्या भूमिकेवर बरीच टीका झाली. बेस्ट आर्थिक संकटात आहे, त्यामुळे बोनस देता येणे कठीण असल्याचे नंतर सांगण्यात आले. परंतु यावेळी कर्मचाऱ्यांना ९ हजार १०० रुपये बोनस देण्याची तयारी दर्शवली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच समितीकडून त्याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.