पीएमसी बँकेमध्ये खाती

मुंबई : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (पीएमसी) र्निबधाने खातेदार असलेल्या बेस्ट उपक्रमातील कामगारांचेही धाबे दणाणले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ५०० बेस्ट कर्मचाऱ्यांची खाती पीएमसी बँकेत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे वेतन दुसऱ्या बँकेत किंवा धनादेशाच्या रूपाने देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

बेस्टमधील कर्मचाऱ्यांचाही पीएमसी बँक खातेदारांमध्ये समावेश आहे. यातील अनेक बचत खाती असून मासिक पगाराची रक्कम पीएमसी बँकांच्या शाखांमध्ये जमा होते. मात्र आर्थिक र्निबधामुळे बेस्ट कर्मचारीही चिंताग्रस्त झाले आहेत. गुरुवारी बँकेने ग्राहकांना खात्यातून सहा महिन्यांत दहा हजार रुपये काढण्यास अनुमती दिली. परंतु त्यामुळेही चिंता मिटली नसल्याचे खातेदार असलेले बेस्टचे चालक मुकेश चंदन यांनी सांगितले. चंदन यांचे घाटकोपरमधील पीएमसी बँक शाखेत खाते आहे. पूर्वी वेतन वेळेत मिळत नव्हते. आता वेतन वेळेत मिळत असले तर ही अडचण उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या पगारासाठी अन्य बँकेत खाते उघडण्याची तयारी सुरू केली आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनीही कामगारांच्या पगारावर झळ येऊ नये म्हणून दुसरे बँक खाते वा धनादेशाची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.