बेस्ट संपावर तोडगा निघेना, उच्चस्तरीय बैठकही निष्फळ

मंत्रालयात शनिवारी झालेली उच्चस्तरीय बैठकही निष्फळ ठरल्याने बेस्टचा संप आणि प्रवाशांचे हाल आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीत बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने आपली बाजू मांडली. बैठकीतील अहवाल समिती सोमवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे. तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरू राहील, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने सोमवारपासून संप पुकारला आहे. संपाच्या सहाव्या दिवशीही बेस्ट उपक्रम आणि संघटना आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. तोडगा निघावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तरीही तोडगा निघाला नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीची बैठक शनिवारी मंत्रालयात झाली. समितीने प्रथम बेस्ट प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. या संदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे म्हणाले, बेस्टची आर्थिक परिस्थिती आणि कामगारांच्या मागण्यांमुळे येणारा आर्थिक बोजा याची माहिती आपण बैठकीत सादर केली. आता समिती निर्णय घेईल. संघटनेलाही चर्चेसाठी दार खुले आहे.

कृती समितीचे नेते शशांक राव म्हणाले, समितीसोबत सकारात्मक चर्चा झाली. एवढे दिवस आमची बाजू कोणीही ऐकत नव्हते. समितीने मात्र आम्हाला समजून घेतले. मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील.

मध्य रेल्वेचा आज दिलासा

बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्ग, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. इगतपुरी आणि बदलापूर-कर्जतदरम्यान रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा उपनगरीय गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. पश्चिम रेल्वेने रविवारी चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक घेतला आहे.

एसटी, खासगी बसचा आधार

बेस्टवर अवलंबून असलेल्या प्रवाशांनी शनिवारी २६३ खासगी बस आणि स्कूल बसमधून प्रवास केला. ग्रॅण्ट रोड, प्लाझा ते अ‍ॅण्टॉप हिल, अंधेरी ते सीप्झ आणि साकी नाका, कांदिवली चारकोप, कुर्ला स्थानक ते सांताक्रुझ परिसरात सर्वाधिक खासगी बस गाडय़ा चालवण्यात आल्या. त्याचबरोबर अंधेरी स्थानक ते सीप्झ, मुंबई सेन्ट्रल आणि मंत्रालय, परळ ते कुर्ला स्थानक पूर्व यासह अन्य मार्गावर ६७ एसटी बस चालवण्यात आल्या.

विद्युत कर्मचाऱ्यांचा छुपा पाठिंबा

बेस्टमधील विद्युत कर्मचाऱ्यांनीही संपाला छुपा पाठिंबा दिला आहे. शनिवारी सात हजार ८९६ विद्युत कर्मचाऱ्यांपैकी १,९२९ कर्मचारीच कामावर उपस्थित राहिले. शनिवारी १,१८३ कर्मचारी साप्ताहिक सुट्टीवर, तर ३४७ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते. १७७ कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली होती. म्हणजेच ५३.९६ टक्के कर्मचारी अनुपस्थित होते. याचा अर्थ चार हजार २६० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहून परिवहनच्या संपाला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते. एवढे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने मुंबईतील विद्युतपुरवठा खंडित होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बेस्ट उपक्रमाने विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेतली. याबाबत महाव्यवस्थापक बागडे यांना विचारले असता, विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही कर्मचारी कामावर नसले तरीही त्याचा विद्युतपुरवठय़ावर परिणाम झाला नाही.