बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत संभ्रम, संपकाळातील पगार कापणार?

बेस्टचा संप मिटल्यानंतर कामगार संघटना आणि शिवसेना यांच्यात पेटलेले आरोप-प्रत्यारोप युद्ध आणि संप काळातील नऊ दिवसांचे वेतन कापण्याच्या चर्चेने कामगारांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अ‍ॅड्. अनिल परब यांनी पगारवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर शिवसेनेला कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यायचीच नाही, हेच परब यांच्या वक्तव्यावरून दिसते, असा आरोप कामगारनेते शशांक राव यांनी केला आहे.

शिवसेनेला वेतनवाढ द्यायचीच नाही – शशांक राव

शिवसेना आमदार अनिल परब यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेला कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यायचीच नाही, हेच दिसून येते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ १७ हजार रुपयांपर्यंत होणार आहे. पहिल्या महिन्यात ही वाढ ३,७०० रुपयांपर्यंत झाल्याचे दिसून येईल. त्यानंतर दीड महिन्यात ती ७,५०० रुपयांपर्यंत होईल आणि वेतन करार झाल्यानंतर म्हणजेच मार्चनंतर याच कर्मचाऱ्यांच्या वेतनात १७ हजार रुपयांपर्यंत वाढ होईल. शिवसेनेला काही करायचे नव्हते हेच यावेळी दिसले.

सात हजार वाढ दिल्यास शब्द मागे घेईन – परब

ज्या कामगारांच्या पगारात पुढच्या महिन्यात सात हजार रुपये वाढतील त्यांनी वेतनपत्रक (पे-स्लीप) दाखवल्यास मी माझे शब्द मागे घेईन, अशा शब्दांत अनिल परब यांनी पगारवाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि शशांक राव यांचा दावा यात तफावत आहे. राव यांनी कामगारांना फसविले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे. या संपातही सुवर्णमध्य साधता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. नऊ दिवस कामगारांची माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले. कनिष्ठ कामगारांचा विचार प्राधान्याने व्हावा, पण सगळ्या कामगारांचा प्रश्न एकत्रितपणे सुटावा ही शिवसेनेची भूमिका होती. परंतु, कनिष्ठ कामगारांबाबतची मागणी राव यांनी ताणून धरली. राव संप ताणत होते म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला, असे परब यांनी सांगितले.

महापालिकेमध्ये बेस्टचे विलिनीकरण करण्याचा ठराव महापालिकेत यापूर्वीच झाला आहे. शिवसेनेचा विलिनीकरणाला विरोध नाही. पण शशांक राव यांच्या संघटनेने त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेनेने कामगारांच्या बाजूने जी भूमिका घेतली होती तीच भूमिका न्यायालयाने घेतली आहे. प्रवाशांना वेठीस धरू नये, कामगारांना नाहक त्रास होऊ  नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, शशांक राव यांची भूमिका दुसऱ्याच कोणीतरी लिहिली असावी, असा संशय परब यांनी व्यक्त केला. दुसऱ्याच कोणाच्या सांगण्यावरून असे वागणाऱ्या राव यांची कीव येते. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे राजकारण केले गेले, असा आरोपही परब यांनी केला.

संप प्रकरणामागे अदृश्य हात!

बेस्ट संपप्रकरणामागे अदृश्य हात आहेत. त्याच अदृश्य हाताचा वापर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी केला गेला. यामुळे कामगारांच्या हातात काहीच पडले नाही. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संप ताणला गेला. नारायण राणे, कपिल पाटील, आशिष शेलार यांनी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे कोणाचे अदृश्य हात आहेत हे यावरून उजेडात आले आहे, असा टोलाही परब यांनी लगावला. शिवसेनेला बदनाम करणे हा अदृश्य हाताचा हेतू होता आणि तोच त्यांचा राजकीय अजेंडा असला तरी शिवसेना कधीही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही परब म्हणाले.