बेस्ट कर्मचाऱ्यांना संपकाळातील गैरहजेरी भोवणार

बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी संप काळातील गैरहजेरी मात्र त्यांना भोवणार आहे. गैरहजेरीमुळे नियमानुसार कर्मचाऱ्यांचे नऊ दिवसांचे वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

कर्मचाऱ्यांचे वेतन कापल्यास बेस्टचा बुडालेला महसूलही वसूल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे ३० हजार कर्मचारी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. नऊ दिवसांच्या या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले. याशिवाय बेस्ट उपक्रमाचे दररोज पावणे तीन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. संपामुळे बेस्टला सुमारे  २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

संप बुधवारी दुपारी मागे घेतल्यानंतर सायंकाळपासून बेस्टसेवा पूर्ववत झाली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्युनियर ग्रेड कर्मचाऱ्यांना दहा टप्प्यांची वेतनवाढ, खासगीकरण न करण्याची ग्वाही, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मध्यस्थाची न्यायालयाकडून नियुक्ती आदी निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केले जाणार नाही आणि कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केल्याचे संघटनांनी सांगितले होते.

मात्र संप मागे घेताच बेस्ट प्रशासन संप काळात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच गदा आणण्याचा विचार करीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार नाही, मात्र नऊ दिवस कामावर गैरहजर राहिल्याने त्या दिवसांचे वेतन दिले जाणार नाही, असे बेस्टमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बेस्टचा महसूल बुडाला असला तरी कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांचे वेतन मिळणार नसल्याने त्यातूनच काही महसूल वसूल होईल, असा दावा प्रशासन करीत आहे.

दरम्यान, या संदर्भात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सर्वाधिक फटका कुणाला?

बेस्ट उपक्रमातील ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यापैकी १३ हजार ५०० ज्युनियर ग्रेड कर्मचारी असून त्यांनाच जानेवारी २०१९ पासून दहा टप्पे वेतनवाढ मिळणार आहे. तर वेतन करार आणि अन्य मुद्दय़ांवर तीन महिन्यांत तोडगा निघेल. त्यामुळे नऊ दिवसांचे वेतन न मिळाल्यास ज्युनियर ग्रेड कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांनाच त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

बेस्ट सेवा पूर्ववत

बुधवारी दुपारी संप मागे घेतल्यानंतर सायंकाळपासून मुंबईतील बेस्ट वाहतूक अंशत सुरू झाली होती. परंतु, गुरुवारी मात्र बेस्टची सेवा नियमित सुरू झाली. घर ते कार्यालय आणि रेल्वे स्थानक या प्रवासासाठी प्रवाशांनी बेस्ट बसनाच पसंती दिली. नऊ दिवस बेस्ट बससेवा बंद राहिल्याने शेअर टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी अवाच्या सव्वा भाडे घेऊन प्रवाशांना लुटल्याच्या तक्रारी आहेत.