बैठकीतून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचा सभात्याग; दोन दिवसांत अनुदान देण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई : दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या ५,५०० रुपये सानुग्रह अनुदानापासून बेस्ट कर्मचारी अद्यापही वंचितच राहिले आहेत. सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी करत बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सदस्यांनी सभात्याग केला. तर दोन दिवसांत अनुदान देण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी केली.

पैसा नसल्याने बेस्ट उपक्रमाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सानुग्रह अनुदानासाठी पैसे कुठून आणणार याची माहिती पुढील आठवडय़ात सदस्यांना देण्यात येईल, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांकडून करण्यात आली होती. मात्र बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. त्यामुळे अनुदान देता येणार नाही, असे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले होते. तरीही मागणी लक्षात घेता मुंबई पालिका आयुक्तांकडे याविषयी चर्चा केल्यानंतर सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात आला होता. परंतु हे अनुदान बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळालेच नाही.

बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत २०१९-२० या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर चर्चा होणार होती. परंतु बुधवारच्या बैठकीत सानुग्रह अनुदानाविषयी चर्चा करण्याची मागणी समितीतील शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांकडून करण्यात आली.

त्या वेळी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याची तारीख जाहीर करण्याची वारंवार मागणी केली. ही मागणी लक्षात घेऊन पैसे पुढील आठवडय़ात याची माहिती देण्यात येईल, असे सांगितले. तारीख जाहीर केली जात नसल्याने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. तर शिवसेना सदस्यांनी दोन दिवसांत तारीख जाहीर करण्याची मागणी केली. अखेर गोंधळात सभा तहकूब करत गुरुवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी जाहीर केले.

‘आर्थिक अडचणीमुळे विलंब’

बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत २०१९-२० या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर चर्चा होणार होती. परंतु बुधवारच्या बैठकीत सानुग्रह अनुदानाविषयी चर्चा करण्याची मागणी समितीतील शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांकडून करण्यात आली. परंतु बेस्टकडे पैसा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. तसेच पालिकेशीही याआधी बोलणी केली आहे. त्यामुळे अनुदान कधी देणार याची तारीख जाहीर करणे अशक्य असल्याचे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.