तिकीट दरांत ४ ते २३ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता

बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनसंदर्भात केलेल्या मागण्या मान्य झाल्या तर वर्षांला ५४० कोटी रुपयांचा बोजा बेस्टवर पडणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. ही वाढ चार ते २३ रुपयांपर्यंतची आहे, अशी माहिती बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बेस्ट उपक्रमाचा क अर्थसंकल्प मनपाच्या अ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी, २००७ पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,९३० रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरित वेतननिश्चिती करावी, एप्रिल २०१६ पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात, २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस द्यावा, अनुकंपा भरती तातडीने सुरू करा, अशा मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केल्या आहेत. यासाठी बेमुदत संपही पुकारला आहे.

मात्र वेतनसंदर्भातील मागण्या मान्य केल्या तर बेस्ट उपक्रमावर वर्षांला ५४० कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्यामुळे निधी आणायचा कुठून, असा प्रश्न आहे. आधीच बेस्टला कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच या मागण्या मान्य झाल्यास बेस्ट भाडेवाढीशिवाय पर्याय उरणार नाही. म्हणून बेस्टने भाडेवाढीचा प्रस्तावही तयार केला आहे. यात ४ ते २३ रुपयांपर्यंतची वाढ दर्शविली आहे. शनिवारी उच्चस्तरीय समितीची बैठक होणार असून बैठकीत बेस्ट भाडेवाढीवरही चर्चेची शक्यता आहे.

न्यायालयात यायला हवे होते..

मागण्यांसाठी थेट संपाचे अस्त्र उगारण्याऐवजी न्याय्य हक्कांसाठी न्यायालयाचे दार ठोठावायला हवे होते. अनेक लोक न्याय्य हक्कांसाठी न्यायालयात येतात. बेस्ट कर्मचाऱ्यांनीही त्याचा कित्ता गिरवायला हवा होता.

..तरच चर्चेला अर्थ

चर्चेची तयारी असल्याचे सांगण्याबरोबरच कामगार संघटनांना संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत. तसे केले तरच चर्चेला अर्थ असेल, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, असे या वेळी पालिका आणि बेस्ट प्रशासनातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.