बेस्ट संपाच्या चौथ्या दिवशीही नागरिकांची मुकाट रखडपट्टी

मुंबई : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून होत असलेले हालही मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. गेले तीन दिवस बेस्टच्या नावाने खडे फोडत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शुक्रवारी स्वत:च प्रवासाच्या समस्येवर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. रेल्वे आणि एसटी बससेवेसोबत खासगी बसवाहतुकीचाही पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना किंचित दिलासा मिळाला तर, आरटीओच्या कारवाईमुळे रिक्षा-टॅक्सीचालकांनी मीटरनुसार भाडे आकारल्याने प्रवाशांचा मनस्ताप काहीअंशी कमी झाला.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला तेव्हा हा संप चार दिवस चालेल, अशी कल्पना मुंबईकरांनी केली नव्हती. त्यानंतर दोन दिवस प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यावरून प्रवाशांमध्ये नाराजीही दिसून येत होती. परंतु, शुक्रवारी प्रवाशांनी संप मिटण्याची आशा बाजूला ठेवत मिळेल त्या मार्गाने इप्सित स्थळ गाठले. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने आज, शनिवारी अनेक कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे अनेकांसाठी शुक्रवारचा दिवस आठवडय़ाचा शेवटचा दिवस होता. हाच काय तो प्रवाशांसाठी दिलासा.

परिवहन विभागाने खासगी बस, शाळाबसमधून प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याचा फायदा अनेक प्रवाशांना झाला. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून अतिरिक्त लोकल फेऱ्या सोडण्यात येत आहेत. मात्र, त्याचा जास्त प्रवाशांनी फायदा न घेतल्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ८ जानेवारी ते १० जानेवारीपर्यंत ५८ हजार जादा प्रवाशांनी प्रवास केला आणि यातून ५ लाख रुपये अधिक उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेने मुख्य व हार्बर मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सोडल्या. परंतु त्याचा फायदा बेस्ट प्रवाशांनी कमीच घेतला. अतिरिक्त फेऱ्या सोडूनही पश्चिम रेल्वेपेक्षा प्रवाशांची संख्या कमी असल्याचे मध्य रेल्वेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. बेस्टचे २५ ते ३० लाख प्रवासी असतानाही त्या तुलनेत लोकलचा फायदा घेणारे प्रवासी कमीच होते.

रिक्षा, टॅक्सींच्या मनमानीचा चाप

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात मुंबईकरांना मदतीचा हात देण्याऐवजी रिक्षा-टॅक्सी चालक जादा भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक करत आहेत. अशा मनमानी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारत परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या दोन दिवसांत विशेष कारवाईत १२१ जणांवर कारवाई केली आहे.

संपकाळात मुंबईकरांना दिलासा देण्याऐवजी जादा भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे असे प्रकार रिक्षा-टॅक्सी चालकांनी केले. त्याविरोधात संताप व्यक्त होताच आरटीओने बुधवारपासून रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मनमानीविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली.  यासाठी मुंबईत अकरा पथक नेमले. या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण १४० प्रकरणे दाखल झाली आहेत. या कारवाईत दंड वसूल करतानाच काहींचे परवानेही जप्त केले. दक्षिण मुंबईसह वांद्रे, अंधेरी ते बोरीवली, वडाळा, चेंबूर, सायन, गोवंडी या भागांत ही कारवाई झाली.   ‘संप काळात रिक्षा-टॅक्सी चालक गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार १०० पेक्षा अधिक जणांवर कारवाई झाली आहे,’ अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.