महाभारतातल्या द्युतात युधिष्ठिर एकामागोमाग एक गोष्टी पणाला लावत गेला आणि हरत गेला, शेवटी सर्वस्व गमावून बसला. बदलत्या काळाशी असंच द्युत खेळणाऱ्या बेस्ट उपक्रमाची अवस्थाही अशीच होत चालली आहे. एकामागोमाग एक नवीन योजना आखल्या, तरी दर वेळी त्या योजना अयशस्वी होत आहेत. आता तर खासगी वाहतुकीलाही तोंड द्यायची वेळ आलेला बेस्ट उपक्रम आपलं सर्वस्व तर गमावून बसणार नाही ना, हा प्रश्न शिल्लक आहे..

स्थापनेपासूनच मुंबईकरांच्या आयुष्यात अगदी जिव्हाळ्याचं स्थान प्राप्त केलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाला गेली काही वर्षे प्रचंड आर्थिक घरघर लागली आहे. विद्युतपुरवठा आणि परिवहन अशा दोन विभागांत काम करणाऱ्या बेस्ट उपक्रमाचा विद्युतपुरवठा विभाग सध्या नफा कमावतो आहे. पण या विभागाने मिळवलेला नफा परिवहन विभागाचा तोटा कमी करण्यासाठी वापरला जातो आणि बेस्टच्या खात्यात तुटीचा अर्थसंकल्प राहतो. यंदा आकडेवारीची कसरत करत शिलकीचा अर्थसंकल्प दाखवला असला, तरी त्यात पालिकेकडून तब्बल ३०० कोटी रुपये अनुदानापोटी मिळणार असल्याचे गृहीत धरले होते. त्यामुळे बेस्टची सध्याची स्थिती ‘बडा घर पोकळ वासा’ अशी आहे. त्यातच राज्य सरकारने मुंबईत बेस्टच्या बंद झालेल्या वातानुकूलित बसच्या मार्गावर खासगी वाहतुकीला परवाना दिला आहे. हा परवाना लवकरच शहरभर झाल्यास नवल वाटायला नको. बेस्टने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीट दरांच्या टप्प्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो निर्णय प्रवासी हितासाठी किती आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारणासाठी किती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सुरुवातीच्या काळात ट्राम, त्यानंतर दुमजली बस आणि एकमजली बस यांच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने मुंबईकरांना चांगलीच सेवा दिली. हळूहळू ट्राम बंद पडल्या आणि त्यांची जागा मुंबईतील रस्त्यांवर बेस्टने घेतली. मुंबईकर आणि बेस्ट हे नातं अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत अगदी घट्ट होतं. या दशकात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण या त्रिसूत्रीने भारतीय अर्थकारणाचे संदर्भ बदलले. अनेक परदेशी कंपन्या भारतात स्वत:ची उत्पादने आणि जाळे पसरू लागल्या. यात ऑटोमोबाइल कंपन्याही आघाडीवर होत्याच. पूर्वी मध्यमवर्गीयांचा संबंध अ‍ॅम्बेसेडर, फियाट आणि मारुती ८०० या तीन गाडय़ांपुरताच होता. फोर्ड, पॅकार्ड, मर्सिडिझ, शेव्हरोले अशा कंपन्यांच्या गाडय़ा फक्त लब्धप्रतिष्ठितांकडे होत्या. पण हळूहळू बाजारपेठ खुली झाली आणि जनसामान्यांना परवडतील अशा गाडय़ा रस्त्यावर आल्या. त्यातच टॅक्सींच्या संख्येत वाढ झाली. पूर्वी आणीबाणीच्या परिस्थितीतच वापरायची टॅक्सी सर्रास वापरली जाऊ लागली. त्यातच शेअर टॅक्सीही सुरू झाल्या आणि हळूहळू बेस्टच्या प्रवासी संख्येला गळती लागली.
२०१०-११ पर्यंत ४५ लाखांवर असलेली प्रवासी संख्या सध्या फक्त २८ लाख एवढी आहे. त्यातही हळूहळू घट होत आहे. दोन वर्षांपूर्वी बेस्टने प्रवासी तिकिटांचे दर वाढवले. वास्तविक काळाची पावले ओळखून ही दरवाढ खूप आधीच व्हायला हवी होती. पण विविध राजकीय समीकरणांचा विचार करून बेस्ट समिती आणि प्रशासनानेही दरवाढ टाळली. त्याच पाश्र्वभूमीवर एकाच वर्षांत दोन महिन्यांच्या अंतराने दोन वेळा दरवाढ करण्याची गरज बेस्ट प्रशासनाला भासली. या दरवाढीनंतर बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी प्रवासी संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामागेही विविध कारणे आहेत.
बेस्टने प्रवासी संख्या वाढवण्याच्या किंवा टिकवण्याच्या दृष्टीने काहीच विशेष प्रयत्न केले नाहीत. उदाहरण द्यायचं, तर घाटकोपर-अंधेरी या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यावर बेस्टने तातडीने काही नव्या आकर्षक योजना किंवा सवलती जाहीर करणे अपेक्षित होते. पण बेस्टने केवळ फीडर रूट चालू करून मेट्रोने जाणारा प्रवासी खाली रस्त्यावर उतरल्यावर आपल्याकडे कसा वळेल, याचा विचार करण्यात धन्यता मानली. विशेष म्हणजे शेअर रिक्षांच्या स्पर्धेने इथेही बेस्ट प्रशासनाला मागे टाकले. यथावकाश या फिडर रूटना प्रतिसाद नाही, या कारणाने ते बंद करण्यात आले. दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बेस्टच्या एकूण मार्गापैकी फक्त दोनच मार्गावर बेस्टला नफा मिळत होता. तर बहुतांश मार्ग तोटय़ात चालले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी बेस्टने काळाची पावले ओळखून त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे होते.
प्रत्यक्षात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात प्रशासनाने धन्यता मानली. बेस्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मोफत वाय-फाय, बेस्टच्या थांब्यांवर त्या थांब्यावर पुढील बस कधी येणार याची माहिती, एखाद्या ठरावीक क्रमांकाची बस एखाद्या थांब्यावर किती वेळात पोहोचेल याची माहिती, अशा अनेक घोषणा बेस्ट प्रशासनाने केल्या आहेत. मध्यंतरी प्रत्येक बस थांब्यावर असलेला क्रमांक एका ठरावीक टेलिफोन नंबरवर एसएमएस केल्यास त्या थांब्यावर पुढील दहा मिनिटांत येणाऱ्या बसची माहिती देण्याची योजना प्रशासनाने आणली होती. ही योजना काही मोजके मार्ग सोडून अजूनही सर्वदूर पसरलेली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्थाही तीच असून अनेक बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ही शोभेची वस्तू झाले आहेत. अनेकदा त्या कॅमेऱ्यांना वायरची जोडणीच नसल्याचे प्रवाशांना दिसते. बेस्टच्या गाडय़ांमध्ये व थांब्यांवर मोफत वाय-फाय देण्याच्या घोषणाही पार हवेत विरून गेल्या आहेत.
वातानुकूलित बसगाडय़ा सुरू करताना मुळातच बेस्ट उपक्रमाने अत्यंत तकलादू गाडय़ा घेतल्या होत्या. या ‘उत्तम’ निर्णयाचा फटका बेस्ट प्रशासनाला आजही बसत आहे. आता या किंगलाँग बसगाडय़ा सेवेतून हद्दपार केल्यानंतर इतर परिवहन उपक्रमांच्या वातानुकूलित सेवांना टक्कर देण्यासाठी बेस्टकडे मोजक्याच दर्जेदार गाडय़ांचा ताफा आहे. विशेष म्हणजे इतर उपक्रमांच्या तुलनेत बेस्ट उपक्रमाचे या गाडय़ांचे तिकीट दरही जास्त आहेत. त्यामुळे प्रवाशांची पसंती इतर वाहतूक उपक्रमांच्या गाडय़ांना जास्त आहे.
नुकतेच बेस्ट उपक्रमावर दूरगामी परिणाम करतील, असे दोन निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असून दुसरा राज्य शासनाच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. पहिला निर्णय आहे, बेस्टच्या सध्याच्या तिकीट दरांच्या टप्प्यांमध्ये फेरफार करून तिकीट दर कमी करण्याचा! या निर्णयानुसार बेस्टच्या लांबच्या प्रवासासाठीचे भाडे कमी होणार आहे. विशेष म्हणजे बेस्टचे सर्वाधिक प्रवासी पहिल्या चार किलोमीटरच्या टप्प्यामध्ये प्रवास करणारे आहेत. त्यांना या तिकीट दर कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा होणार नाही. वास्तविक हा फायदा बेस्ट प्रशासनाला व्हावा, या दृष्टीनेच हा निर्णय झाला आहे. इतर महापालिकांच्या परिवहन उपक्रमांचे लांबच्या प्रवासाचे दर कमी असल्याने प्रवासी त्या उपक्रमाच्या गाडय़ांना पसंती देतात. आता बेस्टने हे दर कमी करत त्या प्रवाशांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. वास्तविक या प्रकरणाला आगामी महापालिका निवडणुकांचाही संदर्भ आहे. पुढील वर्षांत होणाऱ्या या निवडणुकांच्या प्रचाराच्या मुद्दय़ांमध्ये काही तरी ‘करून दाखवले’ हे या कमी झालेल्या दरांमधून काही राजकीय पक्षांना दाखवता येणार आहे. काहीही झाले, तरी येत्या काळात प्रवासी या दरकपातीच्या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात, यावर बेस्टच्या परिवहन उपक्रमाचे भवितव्य अवलंबून आहे.
दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने खासगी बसगाडय़ांना बेस्टच्या बंद पडलेल्या वातानुकूलित मार्गावर सेवा देण्याची परवानगी दिली आहे. ही गोष्ट बेस्ट उपक्रमासाठी नक्कीच घातक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेस्टच्या चालक-वाहक यांचे प्रवाशांबरोबरचे वर्तनही सुधारणे गरजेचे आहे. बेस्टचे चालक थांब्यांवर गाडय़ा न थांबवता त्या पुढे-मागे थांबवतात, प्रवासी गाडीत चढण्याआधीच गाडी सुरू करतात, थांब्यांवर प्रवासी उभे असतानाही गाडी न थांबवता पुढे घेऊन जातात, अशा अनेक घटना दर दिवशी मुंबईत घडतात. आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला हे परवडणारे नाही. प्रवासी संख्येला लागलेली गळती रोखण्यासाठी नुसत्या चकचकीत योजनांच्या घोषणा न करता, त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

रोहन टिल्लू
twitter@rohantillu