वातानुकूलित बससंदर्भात न्यायालयाचा ‘बेस्ट’ला सवाल

आर्थिक तोटय़ामुळे वातानुकूलित बससेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा ‘बेस्ट’तर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला; मात्र आर्थिक नुकसान होत असल्याची सबब दिलीच कशी जाऊ शकते, असा सवाल करत न्यायालयाने ‘बेस्ट’च्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. तसेच या निर्णयामुळे मुंबईबाहेर राहणाऱ्यांची होणारी गैरसोय तसेच ती सुरू ठेवून ‘बेस्ट’ला नुकसान होत असेल तर त्याऐवजी बिगर वातानुकूलित बससेवा का सुरू केली जात नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे.

वातानुकूलित बससेवा बंद केल्याच्या ‘बेस्ट’च्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून ‘बेस्ट’ ही सेवा बंद करू शकत नाही. तर ही सेवा देणे ही पालिकेची घटनात्मक जबाबदारी आहे, असा दावा करत ही सेवा सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. बी. बी. शेट्टी या लेखापालाने अ‍ॅड्. व्ही. पी. पाटील यांच्यामार्फत यासंदर्भात जनहित याचिका केली असून मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे गुरुवारी त्यावर सुनावणी झाली.

मुंबईबाहेर राहणाऱ्यांसाठी ही सेवा खूप सोयीची बनली होती; परंतु ती बंद केल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तर या बस सेवेमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. हा तोटा एवढा होता की, कर्मचाऱ्यांना वेतनही दिले जात नव्हते, असा दावा बससेवा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ‘बेस्ट’तर्फे केला गेला. एवढेच नव्हे, तर या बस लिलावात काढल्या जाणार असून या याचिकेमुळे या प्रक्रियेला खीळ बसू शकते, असेही सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र असा निर्णय कसा काय घेतला जाऊ शकतो, असा सवाल करत न्यायालयाने ‘बेस्ट’च्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

..मग बिगरवातानुकूलित बससेवा का नाही?

‘बेस्ट’ला नुकसान होत होते, तर त्यांनी बिगर वातानुकूलित बससेवा सुरू करावी, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर हे शक्य नसून किती नुकसान होत आहे याचा ताळेबंद देण्याची तयारीही ‘बेस्ट’तर्फे दाखवण्यात आली; परंतु न्यायालयाने ओशिवरा-मुंबई आणि ठाणे-मुंबई या मार्गावरील बससेवेचा आणि त्यामुळे होणाऱ्या नफा-तोटय़ाचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने ‘बेस्ट’ला दिले आहेत. १५ वर्षांपासून ही वातानुकूलित बससेवा सुरू होती आणि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील लोकांना या बससेवेमुळे खूपच दिलासा मिळाला होता; परंतु नुकसान होत असल्याचा दावा करत ‘बेस्ट’ने एप्रिल महिन्यात मुंबईतील २६६ वातानुकूलित बससेवा बंद केली होती.