11 August 2020

News Flash

येथे रात्रंदिन आम्हां ‘सेहरी-इफ्तारी’

मिनारी मशिदीच्या गल्लीत मुंबईकरांना अगदी माहीत झालेले नेहमीचे पदार्थ आहेत.

रमजानमधील पदार्थाची चव चाखण्यासाठी मोहम्मद अली रोडवर जत्रा
दरदिवशी क्षितिजावरच्या काळ्या ढगांची सरकती रांग पाहून मुंबईकर मनोमन मोहरून जातात आणि ही रांग एकही थेंब खाली न पाडता पुढे निघून गेली की हिरमुसले होऊन आपापल्या कामाला लागत आहेत. मात्र बुधवारपासून या काळ्या ढगांआडून चंद्र डोकावताना दिसला की खवय्या मुंबईकरांना ‘चाँद फिर निकला’ या ओळी आपसूकच आठवत आहेत. कारण हा चंद्र काही साधासुधा चंद्र नसून रमजानच्या महिन्यात उगवणारा चंद्र आहे. आसमानमध्ये या माहताबचे आगमन झाले की, मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरच्या मिनारी मशिदीच्या गल्लीत फिरनी, शोर्मा, नल्ली निहारी, कबाब, खिचडा, हलीम, मालपोवा, शिरा-पुरी अशा एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थाची अंजुमन रौशन होते. आता ईदच्या चंद्राचा दीदार होईपर्यंत ही अंजुमन अशीच रौशन होणार आणि या पदार्थावर जीव ओवाळून टाकणारे लाखो परवानें या मफिलीत शरीक होत जाणार आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा रमजानचा महिना लवकरच सुरू झाल्याने मुंबईतील खाद्यप्रेमींसाठी ऐन उन्हाळ्यातच खाद्यपदार्थाची रेलचेल उपलब्ध झाली आहे. दरवर्षी जुन महिन्याच्या मध्यावर रमजान सुरू होतो. त्या वेळी पाऊसही लागला असल्याने मुंबईकर छत्र्या सांभाळून आपली पावले मोहम्मद अली रोडकडे वळवतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या रस्त्यावरील मिनारी मशिदीच्या गल्लीत रमजाननिमित्त खाद्यजत्रा सुरू झाली आहे. या खाद्यजत्रेत असंख्य पालांवर असंख्य पदार्थ खवय्यांची तहानभूक भागवण्यासाठी सज्ज आहेत. काही मुंबईकर महिन्याभरात चार-पाच किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा या गल्लीत हजेरी लावतात. केवळ याच गल्लीत नाही, तर या गल्लीच्या जवळ असलेल्या बोहरी मुहल्ल्यातही विविध पदार्थ खवय्यांचा इंतजार करत आहेत.
मिनारी मशिदीच्या गल्लीत मुंबईकरांना अगदी माहीत झालेले नेहमीचे पदार्थ आहेत. यात खिचडापासून मालपोव्यापर्यंत अनेक पदार्थाचा समावेश आहे. नवोदितांसाठी शोर्मा, कबाब, बदा रोटी, मटण रोल्स आदी पर्याय उपलब्ध आहेत. त्याशिवाय गोड पदार्थामध्ये तर मावा जिलेबीपासून शिरा-पुरी, अफलातून, फिरनी, सांधल, मालपोवा असे अनेक पदार्थ मिळतील. बोहरी पद्धतीचे काही विशेष पदार्थ चाखण्यासाठी जवळच भायखळ्याच्या दिशेला असलेल्या बोहरी परिसरात जाणे गरजेचे आहे. या भागातील बोहरी मशिदीच्या समोरच अनेक पाले उभी आहेत. त्या पालांवर बोहरी पद्धतीचे अनेक पदार्थ मिळतात.
ही खाद्यजत्रा अजून एक महिना म्हणजे ईदपर्यंत चालू राहणार असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 3:27 am

Web Title: best food to eat for iftar and sehri during ramzan
Next Stories
1 रिक्षा निघाली अमेरिकेला!
2 अपात्र झोपुवासीयांना घरे मिळणार?
3 आरक्षण समजून घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव
Just Now!
X