बेस्ट उपक्रमाने आपल्या दैनंदिन पासचे दर कमी करीत केवळ मुंबई शहर अथवा उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. बेस्टच्या बसमधून शहरात दिवसभर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दैनंदिन पाससाठी ४० रुपये, तर उपनगरात ५० रुपये मोजावे लागणार आहेत. गणेशोत्सवात या दैनंदिन पासचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
बेस्टच्या बसमधून दैनंदिन पास योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने बस भाडेवाढ करताना दैनंदिन पासचे दर ७० रुपये केले होते. त्यामुळे हा दैनंदिन पास प्रवाशांना परवडेनासा झाला होता. उपक्रमाने शहर आणि उपनगरांसाठी वेगवेगळे दर जाहीर करावे, अशी मागणी अनेक प्रवाशांनी बेस्टला पत्र पाठवून केली होती. तसेच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला होता.
सध्या संपूर्ण मुंबईमध्ये दिवसभर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दैनंदिन पासपोटी ७० रुपये मोजावे लागत आहेत. दैनंदिन पासमधील भाडेवाढ प्रवाशांना परवडेनाशी झाल्यामुळे शहर आणि उपनगरांसाठी कमी दराचा दैनंदिन पास सुरू करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. बेस्ट समितीने मंजूर केल्यानंतर बेस्ट बसच्या दैनंदिन पासच्या सुधारित दराचा प्रस्ताव ६ जुलै रोजी पालिका सभागृहात सादर करण्यात आला होता. मात्र काही नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नव्हता. पालिका सभागृहाच्या सोमवारच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत तातडीचे कामकाज म्हणून या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला होता. नालेसफाई घोटाळ्यावरून सभागृहात राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरू झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहाचे कामकाज आटोपण्यापूर्वी काही क्षण आधी या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता दैनंदिन पाससाठी शहरात म्हणजे कुलाबा ते माहीम, सायन, प्रतीक्षानगर, वडाळा ट्रक टर्मिनसपर्यंत प्रवासासाठी ४० रुपये, तर सायन-वांद्रय़ापासून पालिका क्षेत्रात प्रवास करण्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. गणेश दर्शनानिमित्त शहर आणि उपनगर परिसरात फिरणाऱ्या भाविकांना हा दैनंदिन पास लाभदायक ठरणार आहे.