बेस्टने २००७ मध्ये संपाला शह देण्यासाठी निर्माण केलेल्या श्रेणीमुळे आता डोकेदुखी

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

बेस्टच्या २००७ सालच्या संपावर तोडगा म्हणून आणि तेव्हाच्या संपकऱ्यांना शह देण्यासाठी घेण्यात आलेल्या कनिष्ठ वेतन श्रेणीवर भरती करण्याचा निर्णयच २०१९ मध्ये बेस्टसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ केल्यानंतर बेस्टवर दर महिन्याला १३ कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेतन कराराच्या मुख्य मागणीसाठी संपाचे हत्यार उपसणाऱ्या कर्मचारी-कामगारांना शह देण्यासाठी २००७ मध्ये या कर्मचाऱ्यांची नाटय़मयरीत्या कनिष्ठ श्रेणीवर भरती करण्यात आली होती. २०११ मध्ये बेस्टमधील रोजंदारांची याच श्रेणीत वर्णी लावण्यात आली. ७  जानेवारीपासून पुकारण्यात आलेल्या बेस्टच्या संपात हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. कामगार संघटनांना अंधारात ठेवून सत्ताधारी आणि प्रशासनाने केलेल्या हातमिळवणीतून हा प्रकार घडला होता. कनिष्ठ वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न वेळीच सोडवला असता तर आज मुंबईकरांचे हाल टळले असते, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

बेस्ट उपक्रमात वेतन करारावरून १९९७, २००७ आणि २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. १९९७ मध्ये बेस्ट कर्मचारी तीन दिवस संपावर होते. तर २००७ मध्ये एका दिवसात तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला होता. पण याचाच फटका सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

बेस्टमध्ये ७ एप्रिल २००७ पर्यंत कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ श्रेणी नव्हती. मात्र प्रशासनाने ७ एप्रिल २००७ रोजी बेस्ट समितीमध्ये सादर केलेल्या कनिष्ठ श्रेणीच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेने मंजुरी दिली. अशा प्रकारे नवी श्रेणी निर्माण करण्यापूर्वी प्रशासनाने युनियनचे मत विचारात घेणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच झाले नाही. हा प्रकार कामगार संघटनांना अंधारात ठेवूनच करण्यात आला. तीच चूक आजच्या संपाचा कळीचा मुद्दा बनली आहे, अशी खंत बेस्ट वर्कर्स युनियनने व्यक्त केली आहे.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ केल्यानंतर बेस्टवर दर महिन्याला १३ कोटी रुपयांचा भार पडेल, असा अंदाज बेस्ट वर्कर्स युनियनने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा नव्या वेतन कराराचा प्रश्न लवादाच्या माध्यमातून सोडविण्याची तयारी युनियनने दर्शविली असून तत्पूर्वी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतन वाढ द्यावी, अशी भूमिका घेतली आहे.

१२ हजार ६०० कर्मचारी

बेस्ट समितीने कनिष्ठ श्रेणीच्या प्रस्तावाला ७ एप्रिल २००७ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर वेतन कराराच्या मागणीसाठी बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांनी १८ एप्रिल २००७ रोजी संप पुकारला. कामगार संघटनांचा संप मोडून काढण्यासाठी आणि संपकऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी १९ एप्रिल २००७ रोजी तातडीने कनिष्ठ श्रेणीवर कर्मचारी भरती करण्यात आली. दरम्यानच्या काळात बेस्टमध्ये १२ हजार जण रोजंदारीवर काम करीत होते. या १२ हजार रोजंदारांचा २०११ मध्ये कनिष्ठ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे कनिष्ठ श्रेणीवरील कर्मचाऱ्यांची संख्या १२ हजार ६०० वर पोहोचली. बेस्टमध्ये ७९५० वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या या कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची श्रेणी २०११ मध्ये कमी करण्यात आली. तब्बल २ हजार ५०० रुपयांनी त्यांची वेतनश्रेणी कमी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्याचा आग्रह आता बेस्ट वर्कर्स युनियनने धरला आहे.