मंगळवारी दिवसभरात ६५ लाखांचे अतिरिक्त उत्पन्न
८ जादा गाडय़ा आणि ४८ गाडय़ा गर्दीच्या मार्गावर वळवल्या
ओला व उबर या खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांच्या विरोधात स्वाभिमान संघटनेने पुकारलेल्या अचानक बंद आंदोलनामुळे टॅक्सीचालकांचा एका दिवसाचा धंदा बुडाला असला, तरी या संपाचा फायदा बेस्टला झाला. मात्र बेस्टने केवळ आठ जादा बसगाडय़ा सोडल्याने आणि इतर मार्गावरून गर्दीच्या मार्गावर ४८ गाडय़ा वळवल्याने या संपाचा म्हणावा तेवढा फायदा बेस्टला उचलता आला नाही. तरीही मंगळवारच्या एका दिवसात बेस्टने ६५ लाख रुपयांचे जादा उत्पन्न मिळवले.
खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांनाही राज्य सरकारने नियमावली लागू करावी, या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. केवळ पाच ते दहा हजार रिक्षा-टॅक्सी एवढीच ताकद असलेल्या या संघटनेच्या दहशतीमुळे इतर संघटनांच्या टॅक्सी चालकांनीही आपला धंदा मंगळवारी बंद ठेवणेच पसंत केले. मात्र, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मुख्य स्थानकांबाहेर नेमाने उभ्या असलेल्या शेअर टॅक्सींचा मंगळवारी पत्ताच नसल्याने प्रवाशांना तंगडतोड करावी लागत होती. परिणामी, मंगळवारी बेस्टच्या बसगाडय़ांना तुलनेने जादा गर्दी होती. शेअर टॅक्सी, तसेच स्वतंत्र टॅक्सी करून कार्यालय गाठणाऱ्या अनेक मंडळींनी अखेर बेस्टकडे धाव घेतली. मात्र बेस्टने केवळ आठ जादा गाडय़ा सोडल्या. तसेच कमी गर्दीच्या ठिकाणी चालणाऱ्या ४८ गाडय़ा जास्त गर्दीच्या ठिकाणी वळवल्या. या बदलामुळे बेस्टला मंगळवारी ४ कोटी ६५ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दर दिवशी बेस्टला साडेतीन ते चार कोटी रुपयांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून मिळते. मात्र मंगळवारच्या दिवशी हा आकडा ४.६५ कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी उत्पन्नात एकाच दिवसात किमान ६५ लाख रुपयांची वाढ झाली. बेस्टने आठपेक्षा जादा गाडय़ा चालवल्या असत्या, तर या उत्पन्नात आणखी वाढ झाली असती. याबाबत बेस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता, बेस्टने मागणीप्रमाणेच आपल्या गाडय़ांची संख्या वाढवली अथवा एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर गाडय़ा वळवल्या, असे त्यांनी सांगितले.