मुंबई : बेस्ट उपक्रमाने पाच रुपये तिकीट दर करताच बेस्टच्या तिजोरीत आतापर्यंत आठ कोटी किमतीच्या नाण्यांची भर पडली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या सुट्टय़ा नाण्यांचे करायचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात बेस्ट समितीत चर्चाही झाली. बेस्टने सामान्य प्रवाशांना शंभर आणि ५०० रुपयांच्या बदल्यात सुट्टी नाणी देण्याचा पर्यायही ठेवला होता. दरम्यान, बेस्ट उपक्रमात असलेले अपुरे मनुष्यबळ आणि त्यामुळे वेळेवर न धावणाऱ्या बसवरही समितीतील सर्वपक्षीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.

बेस्टने ९ जुलै २०१९ पासून तिकीट दरात कपात केली. पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारण्यात आले. बेस्टच्या दरात कपात होताच प्रवासी संख्या वाढली. तिकीट दरात कपात झाल्यानंतर नाण्यांची संख्या आठ कोटी रुपयांवर गेली आहे. त्यात पाच रुपयांच्या नाण्यांचे मूल्य पाच कोटी रुपये इतके आहे. सध्या प्रत्येक दिवशी १४ लाख रुपये मूल्यांची नाणी येत असल्याने त्यांचे करायचे काय असा प्रश्न बेस्टसमोर निर्माण झाला आहे. बेस्टने नाण्यांच्या बदल्यात ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा पर्याय ठेवला होता. परंतु त्यानंतरही नाण्यांची भर पडतच आहे. एवढय़ा नाण्यांचे करणार काय असा सवाल बेस्ट समितीतील भापज सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी केला. या वेळी बैठकीत अपुऱ्या मनुष्यबळाचाही प्रश्न उपस्थित झाला.

* दर कपातीपूर्वी १९ लाख ६४ हजार प्रवासी दररोज प्रवास करत होते.

* कपातीनंतर हीच संख्या २८ लाख ६६ हजारपेक्षा जास्त झाली.