‘एसी’ बस भाडय़ाने घेण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली; ५० कोटी खर्चून ५० मिनीबस भाडेतत्त्वावर

बदलत्या प्रवासी गरजांनुसार दहा वर्षांपूर्वी वातानुकूलित बस सेवा सुरू करूनही गैरव्यवस्थापनामुळे ती बंद करण्याची वेळ आलेला बेस्ट उपक्रम नव्या आतबट्टय़ाच्या व्यवहारासाठी सज्ज झाला आहे. तब्बल ५० कोटी रुपये खर्च करून २१ आसनी ५० मिनी बस पाच वर्षे भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्याकरिता प्रति किलोमीटर ४५ रुपये खर्चण्याची तयारी दाखवणाऱ्या बेस्टने या सेवेचे नफ्या-तोटय़ाचे गणित मात्र मांडलेलेच नाही आहे. तसेच, या सेवेला कुठल्या मार्गावर प्रतिसाद मिळेल याबाबतही बेस्ट प्रशासनाने अभ्यास केलेला नाही.

बेस्ट उपक्रमाने २००८ मध्ये पहिल्यांदा वातानुकूलित बस सेवेत आणल्या. तेव्हापासून बेस्टला कधीही या बसने नफा मिळवून दिला नाही. या बसच्या फेऱ्यांची अत्यल्प संख्या, वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला लागणारा वेळ, त्यामुळे घटत जाणारी प्रवासी संख्या व जुन्या होत असलेल्या बसचा फुगलेला देखभाल खर्च यामुळे बेस्टसाठी वातानुकूलित बस या पांढरा हत्ती ठरल्या होत्या. अखेर बेस्ट उपक्रमाने अगदी महिनाभरापूर्वी ही सेवा बंद केली. मात्र आता बेस्ट नव्या आतबट्टय़ाच्या व्यवहारासाठी सज्ज होत आहे.

राज्य मार्ग परिवहन उपक्रम महामंडळाच्या माध्यमातून एम. पी. एन्टरप्रायझेस अ‍ॅण्ड असोसिएट्स लिमिटेडकडून बेस्ट ५० मिनी वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव गुरुवारी होत असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. या बसच्या भाडय़ापोटी पाच वर्षांत बेस्टला ५० कोटी ६२ लाख रुपये द्यावे लागणार आहे. यात २१ प्रवासी बसू शकतील व ८ जण उभ्याने प्रवास करू शकतील. बस भाडेतत्त्वावर बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने बस खरेदी, देखभाल खर्च वाचू शकेल, असा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. मात्र बेस्टच्या आधीच्या वातानुकूलित बसचा जमाखर्च व प्रवाशांची संख्या पाहता या बसमधून नफा मिळवण्यापेक्षा बेस्टला नुकसानच होणार आहे. फक्त आधीच्या सेवेच्या तुलनेत यात कमी तोटा आहे. केवळ या मुद्दय़ाच्या आधारावर हा प्रस्ताव पुढे रेटण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे म्हणजे या बसना नेमक्या कोणत्या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळेल, याचा अभ्यास न करताच हा घाट घालण्यात आला आहे.

ac-bus-chart

बेस्टच्या तोटय़ाचे गणित

  • गेल्या वर्षी, २०१६ मध्ये वातानुकूलित बस चालवण्यासाठी प्रति किलोमीटर १७८ रुपये खर्च येत होता व त्यातून २८ रुपये उत्पन्न मिळत होते.
  • नव्या भाडय़ाच्या बससाठी बेस्टला प्रति किलोमीटर ४५ रुपये खर्च येणार आहे. आधीच्या तोटय़ापेक्षा या बस चालवणे किफायतशीर म्हणजे कमी तोटय़ाचे असल्याची सारवासारव प्रशासनाने प्रस्तावात केली आहे.
  • जास्त प्रवासी संख्या असलेल्या मार्गावर या बस चालवण्याचा पर्याय बेस्ट विचारात घेत आहे. मात्र बेस्टच्या आधीच्या गाडय़ांमध्ये सरासरी १२ आसने प्रवाशांनी भरलेली होती. त्यामुळे या बस चालवण्यासाठी बेस्ट कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सेवा देण्याची शक्यता आहे.
  • मात्र अशा प्रकारे सेवा देणाऱ्या अनेक खासगी संस्था आहेत. त्यामुळे इतर सर्वसामान्य प्रवाशांना या ४० गाडय़ांचा उपयोग काय असा प्रश्न आहे.

बसवाहकाशिवाय गाडय़ा

या गाडय़ा वाहकाशिवाय चालवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. बसमध्ये चढल्यावर व उतरताना प्रवाशांनी आयएफआरडी कार्ड गाडीतील यंत्रावर टॅप करायचे आहे. या यंत्रावर वेळ, ठिकाण तसेच वापरकर्त्यांची ओळख यांनी नोंद होणार असून संबंधित प्रवासाचे भाडे कार्डमधून वजा करण्यात येईल. त्यामुळे वाहकाच्या खर्चात कपात होऊ शकेल.