महापालिका आणि सरकार मूक साक्षीदार, शिवसेना खिंडीत

आठवडा उलटूनही संप कायम असल्याने ‘बेस्ट’चे चाक रूतलेलेच असून राजकीय हालचालींचे वारू मात्र चौखूर उधळले आहे. न्यायालयाने बुधवापर्यंतची अंतिम संधी देऊनही संप मागे घेणार नसल्याचे बेस्ट कामगार संयुक्त कृतीसमितीने जाहीर केले आहे. त्याचवेळी महापालिका आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच हा संप चिघळत असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. या संपाने शिवसेना खिंडीत सापडल्याने यामागे राजकीय गणितेच असल्याचा आरोप होत आहे.

या संपावर तोडगा निघत नाही, याबाबत मुंबईकरांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. आंदोलक शशांक राव हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेकदा विविध मुद्दय़ांवर चर्चा करतात. पण हा संप सुरू झाल्यापासून उभय नेत्यांनी एकदाही चर्चा केलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.  संपावर तोडगा काढण्यासाठी ‘पहारेकरी’ म्हणविणाऱ्या भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधले, असा सवालही केला जात आहे. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा बैठका घेऊनही संप कायम आहे, हेदेखील सूचक आहे. त्यामुळे युती तोडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी सरकार आणि पाठोपाठ महापालिका प्रशासन संपाची मूक साक्षीदार म्हणून वावरत आहे, अशी टीका होत आहे.

बेस्टमधील कामगार संघटना आणि महापालिका प्रशासनासमोर शिवसेना हतबल ठरल्याचे दिसत आहे. ठाकरे यांच्या तुलनेत निम्मा अनुभव असलेल्या शशांक राव यांच्यासारख्या तरुण नेत्यानेही उद्धव ठाकरे यांना दाद दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हतबल असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. शिवसेनेस ‘पटकण्याचा’ भाजपचा पहिला प्रयोग बेस्टच्या संपातूनच सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे नागरिक भरडले जात असून त्याचा दुष्परिणाम भाजपच्या वाटय़ाला येण्याचीही भीती काही नेत्यांना वाटू लागली आहे.

बस उपलब्ध नसल्याने रिक्षा-टॅक्सीचालक लुबाडत आहेत. लाखो प्रवाशी वेठीस धरले जात असताना सरकार, भाजप नेते मौन बाळगून बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल या हीन राजकारणामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे, याची जाणीव राहिली नसल्याबद्दल जनमानसात टीकेचा सूर उमटू लागला आहे. संपातून तोडगा काढण्याबाबत कोणत्या हालचाली सुरू आहेत, याची माहिती घेण्यासाठी सेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे व आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तथापि प्रतिसाद मिळाला नाही.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लातूरमधील सभेत, युती न केल्यास शिवसेनेला ‘पटकवू’ असा इशारा दिला होता. या इशाऱ्याची पहिली अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या संपात केली आहे. या घाणेरडय़ा राजकारणामुळे बेस्ट संप चिघळत असून उद्धव ठाकरेही हतबल ठरले आहेत.

– नवाब मलिक, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस</p>