येत्या काळात बेस्ट वीज ग्राहकांवर परिवहन शुल्काचा भार पडणार नसला तरी तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून ‘बेस्ट’ पर्याय चाचपडून पाहिजे जात आहे. यात विद्युत शुल्कात वाढ करणे, राज्य सरकार आणि पालिकेकडून सबसिडी मिळवणे, मालमत्तेवर उपकर आकारणे आणि संपूर्ण कराची समान विभागणी करून मुंबईकरांकडून आकारणी करणे, असे चार पर्याय सादर करण्यात आले आहेत. हे पर्याय सरकारकडे विचारविनिमयासाठी पाठविण्यात आल्याचे बेस्ट समितीत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी वीजग्राहकांवर परिवहन शुल्क आकारण्याचा निर्णय बेस्टने मागे घेतला. त्यामुळे १० लाख वीज ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी परिवहन विभागासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे हा तोटा कसा भरून काढायचा असा सवाल मंगळवारी बेस्ट समितीत उपस्थित करण्यात आला. यावर बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी तूट भरून काढण्यासाठी चार पर्याय राज्यसरकारकडे पाठवल्याचे स्पष्ट केले. तसेच वीज ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून ऑनलाइन शुल्क आकारणी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.