घटलेल्या तिकीटदरांमुळे प्रवाशांना सुखद धक्का; मासिक खर्चात बचत झाल्याचे समाधान

मुंबई : बेस्ट बससाठी तासन्तास बसथांब्यावर वाट पाहावी लागणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी सुखद धक्का बसला. तिकिटाचे नवे दर लागू झाल्याने बेस्टचे किमान तिकीट ५ रुपये झाले आहे. नव्या दरांचा पहिलाच दिवस असल्याने बऱ्याचशा प्रवाशांना तिकीट दर कमी झाल्याचे माहितीच नव्हते. मात्र १० रुपयांची नोट पुढे केल्यानंतर बसवाहक ५ रुपये परत देत असल्याचे पाहून बसची वाट पाहात उभे राहिल्याचे समाधान प्रवाशांना वाटत होते.

बसथांब्याच्या बाजूलाच शेअर रिक्षा-टॅक्सी वेळेत उपलब्ध होतात. त्यासाठी बसच्या तिकिटापेक्षा फक्त २ ते ५ रुपयेच जास्त मोजावे लागतात. त्यामुळे प्रवासी बसने प्रवास करणे टाळतात. मात्र आता तिकिटाचे दर निम्म्यावर घसरल्याने बसचे तिकीट आणि शेअर रिक्षा-टॅक्सीचे भाडे यांतील तफावत वाढली आहे. त्यामुळे बसचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरणार आहे. पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येत खूप फरक पडला नसला तरी, जसजसे प्रवाशांना नवे दर माहीत होतील तसतसे प्रवासी मोठय़ा संख्येने बेस्टकडे वळतील, अशी अपेक्षा आहे.

तिकीट दर कमी झाल्याचा सर्वात जास्त फायदा बेस्टचे नियमित प्रवासी असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होत आहे. सुनीता शिंदे धुणी-भांडी करण्याची कामे करतात. कुर्ला येथील भारतनगरपासून वांद्रे पश्चिम येथे त्या कामासाठी येतात. त्यांचा महिन्याचा पगार ७ हजार रुपये आहे. त्यातील १२०० रुपये प्रवासावर खर्च होतात. मात्र आता त्यांचा प्रवासखर्च ६०० रुपयांवर आला, असे सुनीता आनंदाने सांगतात.

सीएसएमटी ते नरिमन पॉइंट दरम्यान धावणाऱ्या  १ क्रमांकाच्या दुमजली बसमध्ये मंगळवारी शिरताच प्रवासी सवयीप्रमाणे दहाच्या नोटा काढू लागले होते. मात्र, बसवाहकाने ‘पाच रुपये तिकीट आहे, पण सुट्टे काढा’ अशी सूचना केली. बसचे तिकीट स्वस्त झाल्याची कल्पना नसलेल्या प्रवाशांसाठी हा धक्का होता. विधानभवनजवळील सिग्नलवर एक प्रवासी उतरला तेव्हा समोर थांबलेल्या टॅक्सीचालकाकडे पाहत म्हणाला, ‘और बढाओ भाडा. १५ नहीं २० रुपया करो. कोई नहीं आनेवाला तुम्हारे पास..’

नाण्यांची डोकेदुखी

अंधेरी पश्चिमेकडून वर्सोवा, यारी रोड, वीरा देसाईकडे जाणाऱ्या बसगाडय़ांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. रोजच बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले. रोज १० रुपये देणारे प्रवासी आजही सवयीप्रमाणे १० रुपये देत होते. त्यामुळे वाहकांना पाच रुपये सुट्टे देताना अडचणी येत होत्या. बेस्टकडे आधीच १० रुपयांची नाणी मोठय़ा प्रमाणावर आहेत. ही नाणी बँका घेत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार १० रुपयांच्या नाण्यात देण्याचीही वेळ बेस्टवर आली होती. आता बेस्टकडे पाच रुपयांचीही नाणी मोठय़ा प्रमाणावर जमण्याची शक्यता आहे.

विधानभवनासमोर शेअर टॅक्सीला मागणी कायम

विधानभवनाजवळ बेस्टचा थांबा आणि शेअर टॅक्सी सुटण्याची जागा दोन्ही एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे संध्याकाळी एकाच वेळी येथे बस आणि शेअर टॅक्सीने जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. खरे तर बेस्टचे भाडे कमी झाल्यामुळे विधानभवन ते सीएसएमटीपर्यंत जाण्यासाठी केवळ पाचच रुपये खर्च होत आहेत, त्याच वेळी शेअर टॅक्सीला मात्र १५ रुपये मोजावे लागतात. तरीदेखील या थांब्यावर शेअर टॅक्सीने जाणाऱ्यांची गर्दी काही कमी नव्हती.  विधानभवनाच्या थांब्यावर येणाऱ्या बसगाडय़ा या मुळातच भरून आलेल्या असतात. त्यामुळे त्या गर्दीत जाण्यापेक्षा अनेकांना शेअर टॅक्सीचा पर्याय सोयीस्कर वाटत होता.