मुंबई : गेल्या दहा महिन्यांत टाळेबंदीत मुंबईत पश्चिम व मध्य रेल्वेबरोबरच बेस्ट उपक्र मातील कार्यरत १२३ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये बेस्टच्या ६० तर रेल्वेच्या ६३ कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे.

टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा सुरूच होती. त्यामुळे चालक, वाहकांसह आगार, बस स्थानकातील कर्मचारी कार्यरत होते. याबरोबरच विद्युत व अभियंता विभागही अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत होता. या काळात अनेकांना करोनाची लागण झाली. बेस्टमध्ये प्रत्यक्षात कर्तव्यावर असलेल्या एकूण २ हजार ८६३ जणांना करोनाची लागण झाली आणि त्यातील ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २ हजार ७३९ करोनामुक्त झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. बेस्ट उपक्र माने आतापर्यंत एकू ण १३४ शिबीर घेऊन त्यात ९ हजार २६ कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी केली असता ३८ जण करोनाबाधित आढळले. सप्टेंबरपर्यंत बेस्टमधील २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आक्टोबरअखेरीस हीच संख्या ५०पर्यंत पोहोचली. मृत कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक-वाहकच आहेत.

बेस्टकडून अत्यावश्यक सेवा दिली जात असतानाच पश्चिम व मध्य रेल्वेनेही लोकल सेवा आणि विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या चालवल्या. त्यामुळे मोटरमन, लोको पायलट, कारशेड, यार्डात काम करणारे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी सेवेसाठी उपस्थित होते. कर्तव्य बजावत असताना यातील ६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये सर्वाधिक मध्य रेल्वेच्या ३५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या २८ कर्मचारीही दगावले आहेत. पश्चिम रेल्वेच्या एकू ण १ हजार ४२७ आणि मध्य रेल्वेच्या १ हजार ३५१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती.

यामध्ये रेल्वेच्या सेवेतील कर्मचारी, निवृत्त अधिकारी व कर्मचारी, त्यांचे कु टुंबीय सदस्यांचा अशा २१० जणांचा मृत्यू मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यात प्रत्यक्षात रेल्वेचे कर्मचारी ६३ असल्याची माहिती दिली.

१०९ कर्मचाऱ्यांना लागण

बेस्ट उपक्र माच्या विविध विभागातील कर्तव्यावर नसताना १०९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आणि त्यातील १२ जणांचा मृत्यू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गावी जाण्यासाठी किं वा  अन्य कामानिमित्त हे कर्मचारी सुट्टीवर होते. त्यावेळी कर्मचारी करोनाबाधित झाले.