किमान अंतरावरील तिकीटदर कमी होणार; प्रवास भाडय़ाच्या टप्पानिहाय सुसूत्रिकरणाला बेस्ट समितीची मंजुरी
घटती प्रवासी संख्या आणि त्यामुळे आटलेले उत्पन्न यांतून धडा घेत ‘बेस्ट’ उपक्रमाने आता तिकीटदरांत सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने एक पाऊल बुधवारी पुढे टाकले. प्रवास भाडय़ाच्या टप्प्यात सुसूत्रिकरण करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानुसार सुधारित प्रवास भाडेटप्प्यात ८, १२, १७, २५, ३५, ४५ हे टप्प्याचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांच्या तिकीटदरांसह मासिकपासही स्वस्त होणार आहे. तिकीट भाडे कमी झाल्यास शेअर रिक्षा-टॅक्सीकडे वळलेले प्रवासी बेस्टकडे आकृष्ट होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर महापालिका आणि त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले.
बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली. मात्र यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. दोन वर्षांपूर्वी ३५ ते ३ लाख एवढी असलेली बेस्टची प्रवासी संख्या सध्या २८ लाखांवर घसरली. त्यामुळे तिकीट दर वाढवून काहीच फायदा झालेला नसल्याने बेस्टच्या भाडेसूत्रात बदल करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या. यात काही दिवसांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला. यात बेस्टच्या प्रवासी भाडेटप्प्यात वाढ करणे, वातानुकूलित बस गाडय़ांचे प्रवासी भाडे कमी करणे आणि मासिक पास स्वस्त करणे अशा बाबी पुढे आल्या. यास बुधवारी बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली.
यात प्रवासीभाडे टप्प्याचा विचार केल्यास यापूर्वी एखाद्या प्रवाशांने ८ किलोमीटरचा प्रवास केल्यास त्याला १० किलोमीटरचे पैसे मोजावे लागत होते. त्यावेळी ८, १२, १७ अशा किमीचे पर्याय उपलब्ध नव्हते. आता हेच टप्पे सुरू करून प्रवाशांने जेवढा किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याच्याकडून तेवढेच पैस घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित बस गाडय़ांचे दर कमी करून प्रवाशांना बेस्टकडे वळवण्याचा पर्याय प्रशासनाकडून अवलंबला जात आहे.

प्रवाशांसाठी आणि उपक्रमासाठी काय ‘बेस्ट’ होणार?
दुरावलेल्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी पॉइंट टू पॉइंट सेवा, आनंद यात्री योजना, ई-पर्स योजनेअंतर्गत ५० रुपये शिल्लक ठेवण्याची अट रद्द होणार, कमिशन तत्त्वावर बस गाडय़ांचे आरक्षण. मुंबई महानगर पालिक हद्दीबाहेरील बस सेवेवरील अतिरिक्त प्रवासभाडे रद्द करण्याचा आहे. बेस्ट समितीच्या बठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला.