२०० वातानुकूलित बसगाडय़ांना विलंब; ३०० बसगाडय़ांची तातडीची दुरुस्ती आवश्यक

मुंबई : बेस्ट प्रवाशांच्या सेवेत भाडेतत्त्वावर येणाऱ्या मिडी व मिनी बसगाडय़ांपैकी २०० गाडय़ांचे आगमन लांबले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत या गाडय़ा बेस्टच्या सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र दर परवडत नसल्याचे कारण देत कंत्राटदाराने २०० गाडय़ा पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याने बेस्टला गाडय़ांची संख्या वाढविणे इतक्यात शक्य नाही. त्यातच सध्या सेवेत असलेल्या ३०० बसगाडय़ांची तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याने वाढत्या प्रवासी संख्येला तोंड देण्याचे आव्हान बेस्टसमोर असेल.

प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी ९ जुलैपासून बेस्ट प्रशासनाने भाडेकपात केली. भाडेकपात करताच बेस्टचे प्रवासी ११ लाखांनी वाढले आहेत. अधिकाधिक प्रवासी सामावण्यासाठी बेस्टला गाडय़ांची संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे. परंतु, गाडय़ांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. गर्दीचा सामना करावा लागतो तो वेगळा. यावर तोडगा म्हणून नोव्हेंबर महिन्यापर्यंत भाडेतत्त्वावरील २०० मिनी व २०० मिडी वातानुकूलित बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. यातील १०० बसगाडय़ा ऑगस्ट महिन्यापर्यंत येणार होत्या. यासाठी दोन कंत्राटदारांना प्रत्येकी २०० बस गाडय़ा पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. परंतु एका कंत्राटदाराने बसगाडय़ांचे दर परवडत नसल्याचे कारण पुढे करून बसगाडय़ा देण्यास असमर्थता दर्शवल्याचे बेस्ट प्रशासनाला सांगितले आहे.

बेस्ट समितीचे भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी अशा कंत्राटदारांना जबाबदारी झटकल्याने काळ्या यादीत टाकले पाहिजे, अशी मागणी केली. ४०० पैकी १०० बस ऑगस्टपर्यंत आल्या असत्या तर मोठा दिलासा प्रवाशांना मिळाला असता. परंतु त्याला आणखी विलंब होणार असल्याने यावर प्रशासनाने लवकरच तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात ३,३३८ बसगाडय़ा आहेत. मात्र बस बंद पडणे, बसमधून मोठमोठे आवाज येणे, आसनव्यवस्था, खिडक्या व्यवस्थित नसणे इत्यादींमुळे ३०० बसगाडय़ांची तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे गणाचार्य म्हणाले.

२०० बसगाडय़ा देण्यास असमर्थ असल्याचे कारण देणाऱ्या कंत्राटदाराला दिल्लीत बसगाडय़ा पुरविण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.